सबळ कारण नसताना सतत स्वस्त धान्य दुकानदारांना वेठीस धरून दहशत निर्माण करण्याचे प्रकार बंद न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे प्रांत उपाध्यक्ष व राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य महेश पुगे यांनी  पत्रकाद्वारे दिला आहे. यासंदर्भात २१ जुलै रोजी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे.
समाजात एखादी अप्रिय घटना घडली की रोष व्यक्त करण्यासाठी त्या घटनेशी काडीमात्र संबंध नसणाऱ्या एसटी बसवर दगडफेक केली जाते. त्याप्रमाणे निवडणूक जवळ आली की आपले पुढारीपण दाखविण्यासाठी किंवा आपल्या संघटनेला प्रकाशात ठेवण्यासाठी काही तथाकथित पुढारी कारण नसताना स्वस्त धान्य दुकानदारांना वेठीस धरतात. संबंधित अधिकारीही जबाबदारीचे भान न ठेवता दुकानदारांना धमकावितात व वेठीस धरतात. स्वस्त धान्य दुकानदारांची संघटना आता जिल्हा, प्रांत आणि देशपातळीवर बळकट झाली आहे. गैरव्यवहार करणाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी किंवा त्यांना पाठीशी घालण्यासाठी संघटना नाही. परंतु अकारण कोणी त्रास देत असतील तर त्याविरोधात स्वस्त धान्य दुकानदार संघटना खंबीरपणे उभी राहील, असेही घुगे यांनी नमूद केले आहे.
अन्नसुरक्षा विधेयकासंदर्भात केंद्र शासनाने जारी केलेल्या अध्यादेशाचा देशातील स्वस्त धान्य दुकानदारांवर होणाऱ्या परिणामाचा आढावा घेण्यासाठी २१ जुलै रोजी दिल्ली येथील बंग भवनात संघटनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होत आहे.
या बैठकीतील चर्चेअंती संभाव्य आंदोलनाविषयी धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, असेही घुगे यांनी म्हटले आहे.