नव्या वर्षांत विविध भाज्यांची आवक वाढली असून भाव कमी झाल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. एरवी एक पाव भाजी घेणारे आज किलोप्रमाणे भाजी खरेदी करीत आहेत. हिवाळ्यात पालेभाज्यांचा आस्वाद घेण्याचा वेगळाच आनंद आहे. या भाज्यासुद्धा मध्यमवर्गीय आणि गरिबांना परवडणाऱ्या असल्याचे बाजारपेठेत दिसून येत आहे.
गेल्या दोन महिन्यात भाज्यांच्या वाढीव भावाने नागरिकांना त्रस्त केले होते. काही दिवसात भाज्यांचे भाव कमी होतील, अशी अपेक्षा असताना डिसेंबर महिन्यातही लोकांना भाज्या चढय़ा भावाने विकत घ्याव्या लागल्या. मात्र, नवीन वर्षांत भाज्याचे भाव स्वस्त झाल्यामुळे लोकांची भाववाढीबाबतची ओरड कमी झाली आहे. विदर्भात थंडी असली तरी त्याचा परिणाम भाज्यांवर झालेला नाही. गेल्या वर्षी पावसामुळे मोठय़ा प्रमाणात शेतीमधील पिके उद्ध्वस्त झाल्याने भाज्यांची आवक घटली होती, त्यामुळे कांदा ८० रुपयांवर गेला होता. मात्र, आज कांदा २० ते २५ किलोप्रमाणे विक्रीला आहे.
हिवाळ्यातमध्ये पालेभाज्या, फुलकोबी, वांगे आदी भाज्याचा आस्वाद घेण्याची मजा काही औरच असते. या सर्व भाज्या स्वस्त झाल्यामुळे मध्यमवर्गीय आणि झोपडपट्टीत राहणारे पुरेशा प्रमाणात भाज्या खरेदी करीत आहेत. मेथी, आंबटचुका, पालक या पालेभाज्यासुद्धा १० ते १५ रुपये किलोप्रमाणे बाजारात विक्रीला आहेत. कोथिंबीर १२० ते २५ रुपये किलो आणि पोपट २५ ते ३५ रुपये किलो प्रमाणे बाजारात विक्रीला आहे. यावर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ाच चांगली थंडी पडायला लागली आहे त्यामुळे या दिवसात पालेभाज्यासह इतरही भाज्यांचा आस्वाद नागरिक घेत आहेत.
भाज्यांचे दर
आठवडा बाजारातील भाज्यांचे प्रतिकिलोचे दर असे- कांदा-१५ ते २०, लसून- ८० ते १००, बटाटा-१५, वांगी- १५ ते २० , टोमॅटो- ३० ते ३५, दोडका-१५ ते २०, भेंडी- २० ते ३० कारली-१५ ते २०, बिन्स- ४०, देशी काकडी-२५ ते ३०, पांढरी काकडी- १५, गवार- २० कोबी- २० ते २५, फूलकोबी-३० ते ३५, हिरवी मिरची-२० ते २५, सिमला मिरची- ३० ते ३५, गाजर ३५, बीट- २० ते २५, आले- ६५, पालेभाज्या पालक, मेथी, चाकवत, शेपू व राजगिरा १५ ते ३० रुपये किलो प्रमाणे विक्रीला आहे.