ठाणे, कळवा आणि मुंब्रा या शहरांमध्ये पाच ठिकाणी स्वस्त दरात डायलेसिसची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. यासाठी शहरातील वेगवेगळ्या भागांमधील पाच केंद्रे निश्चित करण्यात आली असून त्या ठिकाणी डायलेसिस सुविधेसाठी आवश्यक असणारी ५० यंत्रे ठेवण्यात येणार आहेत. ही केंद्रे खासगी तत्त्वावर चालविण्यास देण्यात येणार असली तरी सेवेचे दर मात्र महापालिकेने निश्चित केले आहेत.
ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात सद्य:स्थितीत डायलेसिसची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, तेथे उपचारासाठी येत असलेल्या रुग्णांकडून या सेवेचे दर अधिक असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. यापूर्वी महापालिकेसोबत झालेल्या करारनाम्यानुसार हे दर ठरविण्यात आले आहेत. त्यामुळे आर्थिकदृष्टय़ा कमकुवत असलेल्या रुग्णांना ही सेवा परवडत नाही. डायलेसिस सेवा पुरविण्याठी नेमण्यात आलेल्या कंत्राटदाराचे हित पाहण्यासाठी अशा स्वरूपाचा त्रुटीयुक्त करार केल्याच्या तक्रारी नगरसेवकांकडून केल्या जात होत्या. त्यामुळे स्वस्त दराने ही सेवा पुरविण्यासाठी ठाणे महापालिकेने उशिरा का होईना पाऊल उचलले असून खासगी तत्त्वावर ही सेवा पुरविण्यासाठी धोरणही निश्चित करण्यात आले आहे.
डायलेसिस सुविधेची पाच नवी केंद्रे
महापालिकेच्या आरोग्य विभागाने आखलेल्या नव्या प्रस्तावानुसार पाच ठिकाणी तब्बल ५० डायलेसिस यंत्रे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार टेंभी नाका येथील सी. आर. वाडिया दवाखाना, हिरानंदानी इस्टेट येथील दवाखान्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या इमारतीमधील पहिला मजला, कोरस येथील लोकमान्य टिळक रुग्णालय, मुंब्रा-कौसा प्रभाग समिती कार्यालय, घोडबंदर येथील महापालिकेच्या रुग्णालयात ही केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. ही केंद्रे सुरू करण्याठी सुमारे तीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.
नवे दरपत्रक
नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या या केंद्रांत डायलेसिसच्या सुविधेसाठी तीन प्रकारची वर्गवारी ठरविण्यात आली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांपैकी ज्यांचे उत्पन्न वर्षांला एक लाखापेक्षा कमी आहे, अशांसाठी ही सेवा मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या नागरिकांचे उत्पन्न क्रीमिलेअर मर्यादेपेक्षा कमी असेल अशा रुग्णांना प्रति डायलेसिस ५०० रुपये इतके शुल्क आकारले जाईल, तर या मर्यादेपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या नागरिकांना १००० रुपयांचा दर आकारला जाणार आहे. खासगी तत्त्वावर सुरू करण्यात येणाऱ्या या सेवेसाठी आवश्यक असलेले सर्व साहित्य, रसायने तसेच आवश्यक असलेली औषधे आकारण्यात येणाऱ्या शुल्कामध्ये पुरविणे बंधनकारक करण्यात आले आहे. जेणेकरून इतर साहित्यासाठी रुग्णांकडून अतिरिक्त शुल्क आकारले जाऊ नये, असा यामागील उद्देश आहे.