शिक्षण संस्थेच्या नावाने कार्यालय थाटून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. या प्रकरणी संस्थेच्या कार्यकारी संचालकासह पाचजणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या संस्थेत मोठय़ा प्रमाणात उमेदवारांनी नोकरीसाठी लाखो रुपये भरले असून, फसवणूक झाल्याच्या प्रकाराने मोठी खळबळ उडाली. तिरुमला एज्युकेशन सव्‍‌र्हिस या नावाने हिराचंद श्रीहरी काळे व इतर चौघांनी लातुरात ही संस्था स्थापन केली. संस्थेचे कार्यालय बार्शी रस्त्याजवळ थाटले. संस्थेने मोठय़ा जाहिराती करून बेरोजगारांना जाळय़ात ओढले. गावोगावी व्हिलेज टिचर्स व त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यास सर्कलप्रमुखांची पैसे घेऊन नेमणूक केली. निलंगा येथील महेश मोहन लोंढे यांच्यासह बाराजणांकडून प्रत्येकी १ लाख ६ हजार ५०० रुपये उकळल्याचे निदर्शनास आले. मात्र, आपले बिंग फुटण्याचे लक्षात येताच आरोपी हिराचंद काळे व त्याच्या साथीदारांनी लातुरातून काढता पाय घेतला. महेश लोंढे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात संस्थेचा व्यवस्थापक संचालक हिराचंद श्रीहरी काळे, नंदिनी हिराचंद काळे, देवानंद उद्धव सातपुते, दिनेश उद्धव सातपुते (चौघेही डोंगरगाव, तालुका शिरूर अनंतपाळ), तसेच प्रणाली पांडुरंग सोनवणे (रुई, तालुका लातूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.