लातूर येथील भारतीय समृद्धी फायनान्सच्या कर्जाच्या बनावट नोटिसा तयार करून, न्यायालयाच्या नावाचा दुरुपयोग करून फसवणूक केल्याप्रकरणी चाकूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी माणिकराव सातव यांच्या फिर्यादीवरून वकिलासह दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
चाकूर न्यायालयात राज्य विधिसेवा समितीच्या निर्देशाप्रमाणे लोकअदालतीचे आयोजन केले होते. न्यायालयात भारतीय समृद्धी फायनान्स लि.मार्फत कर्जाची बनावट नोटीस तयार करून तडजोडीसाठी दिवाणी, फौजदारी न्यायालयात पैसे भरण्यासाठी उपस्थित राहण्याची नोटीस देण्यात आली होती. हा प्रकार लक्षात येताच दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग न्यायालय चाकूर यांनी, न्यायालयाच्या नावाचा दुरुपयोग व फसवणूकप्रकरणी फिर्याद दिल्याने अ‍ॅड. विकास शिंगटे (लातूर) व इतर दोघांविरुद्ध चाकूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. श्रीरंग बाबूराव डांगे, नागनाथ सुभा मिटकरी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.