वीजबचत करायचीय, तर मग या बल्बऐवजी तो बल्ब वापरा, त्या पंख्याऐवजी हा पंखा लावा, वॉशिंग मशीनचा प्लग काढा आणि फ्रीज जास्त वेळा उघडू नका.. बील कमी करण्यासाठी वीजपुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून अशा सतराशे साठ सूचनांचा मारा होत असतो. वीजदर गगनाला भिडल्याने ग्राहकही या सूचनांचे पालन करीत असतात. यातच एखादे उपकरण लावून विजेचे बील कमी होण्याचे आश्वासन बेस्टसारख्या वीजकंपनीच्या दाखल्यानेच कोणी देत असेल तर मग ग्राहकही हजार-दीड हजार रुपये खर्च करायला तयार होतात. याच मानसिकतेचा फायदा घेऊन पॉवर सेव्हर युनिट विकणारी टोळी सक्रिय झाली आहे. मात्र अशा प्रकारच्या कोणत्याही यंत्राबाबत बेस्ट उपक्रमाला कल्पना नसल्याचे बेस्टकडून स्पष्ट करण्यात आले.
बेस्टकडून पाठवण्यात येणाऱ्या बिलाच्या मागे वीजबचतीसाठी काही सूचना केलेल्या असतात. या जागेवर पॉवर सेव्हर युनिट लावण्याबाबतची सूचना असलेले बील दाखवून विक्रेते स्वत:जवळचे यंत्र दाखवतात. या यंत्राची किंमत हजार ते दीड हजार रुपयांपर्यंत सांगितली जाते. पॉवर प्लगमध्ये हे यंत्र लावले की बील कमी येईल, असे सांगितले जाते. त्यातच समोरचा ग्राहक पाहून यंत्राच्या किमतीत सूट देण्याचे ‘औदार्य’ही दाखवले जाते. बेस्टकडूनच यंत्र वापरण्याचा सल्ला दाखवला गेल्याने अनेक ग्राहकही या विक्रीटोळीच्या क्लृप्तीला बळी पडतात.
याबाबत बेस्ट समितीच्या बैठकीत सदस्य केदार होंबाळकर यांनी माहिती दिली. असे यंत्र वापरण्याबाबत बेस्ट उपक्रमाकडून सल्ला दिला जात आहे का, असा प्रश्न होंबाळकर यांनी केला. मात्र अशा कोणत्याही यंत्राबाबत माहिती नसल्याचे बेस्टचे महाव्यवस्थापक ओमप्रकाश गुप्ता यांनी स्पष्ट केले. अशा प्रकारे ग्राहकांना लुबाडणाऱ्या गटाशी बेस्टचा कोणताही संबंध नाही. ग्राहकांनी याबाबत सतर्क राहावे, असे आवाहन गुप्ता यांनी केले.
या यंत्रामुळे बील कमी होत नाही. मात्र हे विक्रेते साधारणत: उन्हाळ्याच्या शेवटी किंवा ‘ऑक्टोबर हीट’नंतर हिवाळ्याच्या सुरुवातीला या युनिटची विक्री करतात. या काळात हवा थंड होत असल्याने साहजिकच पंखा, फ्रिज, एसी यांचे बील कमी होते व ग्राहकांना या यंत्राचा उपयोग झाल्यासारखे वाटते.
मात्र दोन-तीन महिन्यांत त्याच्यामागील सत्य लक्षात येऊ शकते. अशा प्रकारची यंत्रे
केवळ दक्षिण मुंबईतच नव्हे तर ठाणे-नवी मुंबईतही विकली जात आहेत. ग्राहकांनी याबाबत दक्षता बाळगण्याची सूचना बेस्टकडून करण्यात आली.