लष्करात भरती करण्याचे आमिष दाखवून तीन लाख रूपये उकळणाऱ्या कीर्तनकारासह तिघांविरूध्द कारवाई करण्याचे आदेश पारनेर न्यायालयाने सुपे पोलिसांना दिले आहेत. या फसवणूक प्रकरणी सुपे पोलिसांकडे दि. ३१ आक्टोबर १२ ला तक्रार करण्यात आली होती, परंतु पोलिसांनी कारवाई टाळल्याने न्यायालयात फिर्याद दाखल करण्यात आली होती. न्यायालयासमोर फिर्यादीने आपली बाजू मांडल्यानंतर न्यायालयाने पोलिसांना कारवाईचे आदेश दिले.
तालुक्यातील गटेवाडी येथील जनाबाई उत्तम दिवटे यांचा मुलगा किरण यास लष्करात भरती करण्याचे आमिष दाखवून ज्ञानेश्वर अमृता गट, बाळशीराम महाराज बिडकर व बाळासाहेब शिंदे यांनी दि. २७ एप्रील २०१० ला तीन लाख रूपये घेतले. लष्करातील अधिकाऱ्यांशी चांगले संबंध आहेत. त्यांना तीन लाख रूपये दिल्यानंतर नोकरी हमखास मिळेल असे त्या वेळी सांगण्यात आले. आरोपी धार्मिक वृत्तीचे व वारकरी संप्रदायातील असल्याने त्यांच्यावर विश्वास ठेवला. मात्र पैसे देऊन वर्ष उलटल्यानंतरही मुलगा भरती न झाल्याने जनाबाई गट यांनी त्यांच्याकडे विचारणा केली असता तिघांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली. वारंवार मागणी केल्यानंतर अखेर पैसे परत करण्यासही स्पष्ट नकार दिला. त्यामुळे आरोपींकडून पैसे परत मिळण्याची शक्यात धुसर झाल्याने जनाबाई यांनी सुपे पोलिसात तक्रार अर्ज दिला. मात्र तत्कालीन पोलिस निरीक्षक पाटील यांनी चौकशी करतो, पहातो असे म्हणत गुन्हा दाखल केलाच नाही. वारंवार हेलपाटे पोलिसांकडून दाद न मिळाल्याने अखेर पारनेर न्यायालयात फिर्याद दाखल करण्यात आली.
न्यायालयाने पोलिसांना चौकशीचा आदेश देतानाच कारवाईचा अहवाल सादर करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. यासंदर्भात सुपे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारूती मुळूक यांच्याशी संपर्क साधला असता न्यायालयाच्या आदेशाची प्रत प्राप्त झाल्याचे सांगून चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.