लातूर पंचायत समितीच्या नवीन इमारतीच्या संरक्षण भिंतीबाबत फसवणूक केल्याप्रकरणी मनसेचे तालुका चिटणीस नितीन ढमाले यांनी आठ महिने पाठपुरावा केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला अखेर जाग आली. संबंधितांनी १५ दिवसांत याबाबत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ढमाले यांनी लातूर पंचायत समिती नवीन इमारतीची संरक्षण भिंत न बांधताच जय महाराष्ट्र मजूर सहकारी संस्था नळेगाव (तालुका चाकूर) शाखा अभियंता, उपअभियंता यांनी संगनमताने संरक्षण भिंत बांधल्याची बनावट मापे मोजमाप पुस्तिकेत घेऊन ९ लाख ८५ हजार १५६ रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार गेल्या मेमध्ये दिली होती. त्यासंबंधीचे सर्व पुरावे जोडून ६ स्मरणपत्रे जिल्हा परिषदेला पाठवली. जिल्हाधिकाऱ्यांनी जि. प.च्या कार्यकारी अभियंत्यांना चौकशीचे आदेश देऊनही त्यांनी यावर काहीच कारवाई केली नव्हती. आठ महिन्यांनंतर जि.प.च्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी १५ दिवसांत या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करावा, असे पत्र दिले. दरम्यान, या प्रकरणी जि.प. अधिकाऱ्यांनी योग्य कारवाई न केल्यास मनसे स्टाईल उत्तर द्यावे लागेल, असा इशारा ढमाले यांनी दिला.