ओढा शिवारातील शेत जमिनीचे बनावट दस्तावेज तयार करून फसवणूक केल्या प्रकरणी १० जणांविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात जेलरोड येथे वास्तव्यास असलेल्या बाळासाहेब ढिकले यांनी तक्रार दिली आहे. शहरातील जी क्रमाकांच्या दुय्यम निबंधक कार्यालयात हा प्रकार घडल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. ढिकले यांची ओढा शिवारात गट क्रमांक १३८, १४५, १४६ शेतजमीन आहे. या जमिनीचे गंगाधर कारभारी जाधव, कैलास ढिकले, त्र्यंबक सहाणे, प्रशांत जाधव, चेतन फटवड, हेमंत भालेराव, प्रकाश पगार, योगेश कुलकर्णी, भास्कर पगार व राजेंद्र गायकवाड या दहा संशयितांनी बनावट कागदपत्रे तयार केली. ही बनावट कागदपत्रे खरी असल्याचे भासवून संशयितांनी फसवणूक केल्याचे ढिकले यांनी म्हटले आहे. यावरून दहा संशयितांविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, नाशिक शहर व परिसरात जागेचे भाव गगनाला भिडल्यानंतर मागील काही वर्षांत फसवणुकीचे प्रकार वाढीस लागले आहेत. मूळ मालकाला अंधारात ठेवून परस्पर त्याचा भूखंड अथवा जमिनीची विक्री करण्याचे काही प्रकार मध्यंतरी उघडकीस आले होते. अशाच एका मालमत्तेच्या प्रकरणात एका प्राध्यापकाविरुद्ध दोन गुन्हे दाखल झाले होते. असे प्रकार निदर्शनास आल्यावर पोलीस संशयियांविरुध्द कायदेशीर कारवाई करतात. तथापि, या स्वरुपाच्या फसवणुकीच्या प्रकारांवर नियंत्रण मिळविणे शक्य झालेले नाही. ओढा शिवारातील शेत जमिनीची बनावट कागदपत्रे बनविण्याचा प्रकारही त्याचे निदर्शक म्हणता येईल.