जिल्हय़ातील १ हजार १९० कलावंत तसेच मानधनासाठी दाखल झालेले ३८८ प्रस्ताव यांची फेरतपासणी करण्याचा निर्णय जिल्हास्तरीय वृद्ध कलावंत मानधन समितीच्या सभेत आज घेण्यात आला. यातील ३८८ प्रस्तावांची येत्या आठ दिवसांतच तपासणी केली जाणार आहे.
समितीची सभा आज दिलीपराव बनकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सदस्य प्रशांत नेटके, भाऊसाहेब उडाणशिवे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, समाजकल्याण अधिकारी प्रदीप भोगले तसेच पंचायत समित्यांचे अधिकारी या वेळी उपस्थित होते. सभेनंतर बनकर व नेटके यांनी ही माहिती दिली. समितीच्या सदस्यांना ओळखपत्र देण्याची मागणीही करण्यात आली. मानधन देताना अधिक वयोवृद्ध, लोप पावत चाललेल्या कलांचे जतन करणारे कलावंत, समाजप्रबोधन करणारे कलावंत यांना प्राधान्य देण्याचा निर्णयही घेण्यात आला.
सभेत नेटके यांनी मृत कलावंतांच्या मानधनाचा विषय ऐरणीवर आणला. सध्या मानधन मिळणारे काही कलावंतांचे निधन झाले. नियमानुसार वारस म्हणून त्यांच्या पत्नीला मानधन दिले जाते. परंतु पत्नीचे निधन झाल्याने काही ठिकाणी याचा निधी पंचायत समितीत जमा झालेला आहे. वर्षांपासून हा निधी आता थेट बँक खात्यात जमा होत असला, तरी बँक सहा महिन्यांनंतर हयातीचा दाखला घेते, तोपर्यंत हा निधी बँकेत जमा होत राहतो तसेच वर्षांपूर्वी पंचायत समिती पातळीवर पडून राहिलेला निधी मोठा आहे. त्याची माहिती जमा करण्याचा निर्णय झाला. कलावंताच्या निधनानंतर त्याऐवजी त्या तालुक्यातील पर्यायी कलावंतांची निवड करण्याचा ठरावही सभेत करण्यात आला.
अनेक ठिकाणी योग्य व गरजू कलावंतांऐवजी दलालांमार्फत मानधनासाठी प्रस्ताव दाखल होतात, त्यामुळे योग्य कलावंत मानधनापासून वंचित राहतात. कमी वयाच्या कलावंतांचेही प्रस्ताव येतात. उत्पन्नाच्या दाखल्यासंदर्भातही तक्रारी असतात, यासाठी मानधन घेणाऱ्या १ हजार १९० जणांच्या तसेच सध्या दाखल झालेल्या ३८८ प्रस्तावांची फेरपासणी करण्याचा निर्णय समितीने घेतल्याचे नेटके यांनी सांगितले. वयोवृद्ध कलावंतांनी पंचायत समितीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांशी संपर्क करून प्रस्ताव दाखल करावेत, असे आवाहन बनकर यांनी केले.