शहरातील अधिक गतीमान व तांत्रिक सदोष इन्फ्रारेड विद्युत मीटरची आता एका विशेष समितीकडून तपासणी करण्यात येणार असल्याची घोषणा महावितरण कंपनीने केली आहे. असे असले तरी महावितरणच्या समितीकडून होणारी ही तपासणी केवळ औपचारिकता किंवा फार्स ठरण्याची शक्यता आहे. महावितरण या प्रकरणात स्वत:ला दोषी ठरवू शकत नसल्याने या मीटरची सखोल तांत्रिक तपासणी आय.आय.टी.सारख्या स्वतंत्र उच्च श्रेणीतील संस्थांकडून करण्यात यावी म्हणजे खरे खोटे निष्पन्न होईल, अशी नागरिकांची मागणी आहे.
लोकसत्ताने या शहरात लावण्यात आलेल्या तांत्रिक सदोष व दुप्पट तिप्पट बिले आकारणाऱ्या इन्फ्रोरेड मीटरचा प्रश्न वेळोवेळी उचलून धरला. या वृत्तामुळे महावितरणमध्ये खळबळ निर्माण झाली होती. या प्रश्नाची गंभीर दखल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे, आमदार पांडूरंग फुंडकर व आमदार विजयराज शिंदे यांनी घेतली. या आमदारांनी ऊर्जामंत्री, राज्यमंत्री व महावितरणला यासंदर्भात धारेवर धरले. अखेर मीटर तपासणीचे आदेश देण्यात आले. पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडय़ाने नाकारलेले इन्फ्रारेड मीटर बुलढाणा शहर व जिल्हावासियांच्या माथी मारण्यात आले. महावितरण कंपनीने कारण नसतांना बळजबरीने लावलेल्या या विद्युत मीटरमुळे ग्राहकांना दुप्पट तिप्पट बिले येऊ लागली आहेत. या संदर्भात विधान परिषदेत विरोधी पक्षनेते विनोद तावडे, पांडूरंग फुंडकर, विधानसभेत विजयराज शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यावर ऊर्जामंत्री राजेश टोपे व राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी या विद्युत मीटरची तांत्रिक तपासणी केली जाईल, असे आश्वासन सभागृहात दिले. आता यासाठी एक तपासणी समिती येणार असून नागरिकांच्या तक्रारीद्वारे ते मीटरची तपासणी करतील. या मीटरच्या संदर्भात महावितरण कंपनी पुरवठादार व कंत्राटदार, तसेच या मीटरचा दुराग्रह करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहे. त्यामुळे तपासणी समितीद्वारे होणारी तपासणी ही औपचारिक व आश्वासन पूर्तीचा एक फार्स ठरणार आहे. यात महावितरण कंपनी आपल्या चुकांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करणार असल्याचे दिसते. इन्फ्रारेड मीटरची तपासणी आय.आय.टी.सारख्या तांत्रिकदृष्टय़ा सक्षम व स्वतंत्र यंत्रणांकडून करण्यात आल्यास उत्पादक, पुरवठादार व कंत्राटदार यांची लबाडी सहज सिध्द होऊ शकते. त्यामुळे इन्फ्रारेड मीटरची तपासणी अशाच संस्थेच्या इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक व संगणकीय विभागाकडून करण्यात यावी, असे मत महावितरणमधील माजी मुख्य अभियंत्यांनी व्यक्त केले. बुलढाणा शहराच्या भाग एकमध्ये दहा हजार इन्फ्रारेड मीटर लावण्यात आले. महावितरण भाग दोनमध्ये असे मीटर लावणार होते, मात्र नागरिकांची ओरड केल्यानंतर ते लावणे बंद करण्यात आले. भाग एकमध्ये या मीटरमुळे नागरिकांची अव्वाच्या सव्वा रुपयांनी अद्यापही लूबाडणूक सुरू आहे. नागरिकांच्या वाढत्या बिलांच्या प्रचंड तक्रारीमुळे महावितरणच्या एका कनिष्ठ अभियंत्याची प्रकृती बिघडली. या त्रासाला कंटाळून अखेर त्याने महावितरणमधून स्वेच्छानिवृत्ती पत्करली. या अशा मीटरमुळेच या अधिकाऱ्याचा हकनाक बळी गेला, असे मत विद्युत कामगार संघटनेच्या एका नेत्याने व्यक्त केले. लोकसत्ताने हा प्रश्न धसास लावल्याबद्दल विद्युत ग्राहक व कामगार संघटनांनी लोकसत्ताचे अभिनंदन केले आहे.