काटोलनजिक मालगाडीचे डबे रुळावरून घसरल्यामुळे विस्कळीत झालेली चेन्नई- नवी दिल्ली मार्गावरील दोन्ही दिशांची रेल्वे वाहतूक २८ तासांच्या मदतकार्यानंतर सुरळीत झाली आहे.
विदिशाहून गव्हाची पोती भरून विशाखापट्टणमला जाणाऱ्या एका मालगाडीचे १२ डबे नरखेड- नागपूर दरम्यानच्या सोनखांब व कोहळी रेल्वे स्थानकांदरम्यान बुधवार- गुरुवारच्या मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास रुळांवरून घसरले. दोन्ही रेल्वेमार्गाचे नुकसान झाल्यामुळे नवी दिल्ली-चेन्नई मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. यामुळे काही गाडय़ा रद्द करण्यात आल्या, तर अनेक गाडय़ांचे मार्ग बदलण्यात आले.
या अपघाताची माहिती मिळताच विभागीय रेल्वे व्यवस्थापक ओ.पी. सिंग यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी रवाना झाले. दोन्ही रेल्वेमार्गाच्या दुरुस्तीचे काम मध्यरात्रीच सुरू झाले. नागपूर व इटारसीहून पोहचलेल्या दोन क्रेन्सच्या मदतीने नादुरुस्त झालेल्या रुळांच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. नागपूर, आमला व इटारसीहून ब्रेक व्हॅन घटनास्थळी पोहचल्या. चारशेहून अधिक मजूर रेल्वेमार्ग पूर्ववत करण्याच्या कामात लागले होते. काल सायंकाळपर्यंत नागपूरहून नवी दिल्ली मार्गावरील वाहतूक सुरू झाली होती.
युद्धपातळीवर सुरू असलेले दुरुस्तीचे काम अपघातानंतर २८ तासांनी पूर्ण होऊन दोन्ही रेल्वेमार्गावरील वाहतूक सुरू झाली. शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता नवी दिल्ली- नागपूर या मार्गावर पहिली मालगाडी धावली. आज काही गाडय़ा उशिराने धावल्या, परंतु कुठलीही गाडी बदललेल्या मार्गाने धावली नाही, असे रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील यांनी सांगितले. नागपूर विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम करून अतिशय कमी वेळात दुरुस्तीचे काम पूर्ण केल्यामुळे विस्कळीत झालेली रेल्वे वाहतूक लवकरच पूर्ववत होऊ शकली. रेल्वेच्या सर्वच विभागांनी सांघिक भावनेतून हे काम पूर्ण केल्याचेही ते म्हणाले.