शालेय अभ्यासक्रमात बुद्धिबळ खेळाचा समावेश निश्चितपणे करण्यात येईल, असे आश्वासन पंतप्रधानांचे वैधानिक सल्लागार डॉ. सॅम पित्रोदा यांनी येथे दिले. डी.लिट पदवी दिल्याबद्दल राजीव गांधी नॅशनल बुध्दिबळ अॅकॅडमीचे संचालक काशिनाथ मंगल यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.    येथील राजीव गांधी नॅशनल चेस अॅकॅडमीच्या कार्याची त्यांनी माहिती घेतली. शिक्षकांसाठी तयार केलेल्या सहा आठवडय़ाच्या सर्टिफिकेट कोर्सला शिवाजी विद्यापीठाने मान्यता दिली आहे. याबाबत समाधान व्यक्त करून शालेय अभ्यासक्रमात बुध्दिबळाचा देशपातळीवर समावेश करण्यास त्यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. सध्या ३२ देशांनी शालेय शिक्षणामध्ये बुध्दिबळाचा समावेश केला असून साडेपाच लाखांहून अधिक शाळांमध्ये हा उपक्रम चालू आहे, असे त्यांना सांगण्यात आले.या वेळी आंतरराष्ट्रीय बुध्दिबळपटू बँक ऑफ इंडियाच्या पुष्पलता मंगल, कुलगुरू डॉ.एन.जे.पवार,परीक्षा नियंत्रक डॉ.बी.एम.हिर्डेकर, बाबासाहेब मंगल, सिनेट सदस्य प्रा.अमरसिंह चव्हाण आदी उपस्थित होते.