News Flash

भुजबळ यांनी घेतली अधिका-यांची झाडाझडती

जलसंपदा, वन व सार्वजनिक बांधकाम या खात्यांमध्ये ताळमेळ नसल्याने जागेचा प्रश्न सुटू शकला नाही व पैसे परत गेल्याचे स्पष्ट होताच पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी भंडारदरा

| July 24, 2013 01:48 am

भंडारदरा-घाटघर परिसराच्या पर्यटन विकासासाठी केंद्राकडून आलेले सहा कोटी रुपये जागेचा प्रश्न न सुटल्याने परत गेले. जलसंपदा, वन व सार्वजनिक बांधकाम या खात्यांमध्ये ताळमेळ नसल्याने जागेचा प्रश्न सुटू शकला नाही व पैसे परत गेल्याचे स्पष्ट होताच पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी भंडारदरा येथे आयोजित आढावा बैठकीत संबंधित अधिका-यांना चांगलेच खडसावले. सबबी सांगू नका, महिनाभरात जागेचा प्रश्न मार्गी लावा, अशी तंबी त्यांनी अधिका-यांना दिली. वारंघुशी फाटा ते भंडारदरा या रस्त्याबाबतही जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभागात असलेल्या मतभेदांवरही त्यांनी संबंधित अधिका-यांना अशीच जाणीव करून दिली.
तालुक्यातील पर्यटन विकासकामांबाबत आढावा घेण्यासाठी भुजबळ यांच्या उपस्थितीत भंडारदरा येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे संपर्कमंत्री मधुकरराव पिचड होते. भंडारदरा व घाटघर येथे रिसोर्ट व अन्य पर्यटन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी गतवर्षी ६ कोटी रुपये मंजूर झाले होते. मात्र त्यासाठी आवश्यक असणा-या जागेचा प्रश्न न सुटल्याने हे पैसे शेवटी परत गेले. भंडारदरा येथे जलसंपदा विभागाने संपादित केलेली जमीन सन १९५८ मध्ये पर्यटन विभागाच्या ताब्यात देण्यात आलेली आहे. मात्र ही जागा अद्याप त्या खात्याच्या नावावर झालेली नाही. त्यामुळे तेथे नवीन बांधकाम करता येत नाही. कोणत्याही खात्याची जागा ही शेवटी सरकारची म्हणजे जनतेची असते. स्वत:च्या खात्यासाठी जागा वापरायची नाही व दुस-या खात्याला विकसित करायलाही द्यायची नाही या प्रवृत्तीवर त्यांनी कडक शब्दांत टीका केली. या वेळी भुजबळ यांनी आक्रमक शैलीत विविध प्रश्न विचारल्यानंतर संबंधित अधिकारी निरुत्तर झाले.
घाटघर येथे वनकायद्यामुळे नवीन बांधकाम करण्याला अडचणी येत असतील तर तेथे पर्यावरण पूरक बांधकामे करा असा सल्ला त्यांनी अधिका-यांना दिला. वारंघुशी फाटा ते भंडारदरा या रस्त्याची सध्या अत्यंत दुर्दशा झाली आहे. या खात्याची मालकी जलसंपदा विभागाकडे असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग त्याची दुरुस्ती करायला तयार नाही या वादाबद्दलही भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली. रस्ता ताब्यात घेण्याचा प्रस्ताव तयार करा त्याचबरोबर रस्त्याच्या दुरुस्तीचे कामही हाती घ्या अशा सूचना त्यांनी आपल्या विभागाच्या अधिका-यांना केल्या.
रस्ते चांगले नसतील तर पर्यटनस्थळी लोक कसे येणार असा सवाल त्यांनी केला. विविध खात्यांनी सहकार्य केले तरच पर्यटन खाते काही करू शकेल असेही त्यांनी सांगितले. अकोले तालुक्यात पर्यटन विकासाला भरपूर वाव आहे. नाशिकजवळच्या सापुत-यात अनेक पंचतारांकित हॉटेल, रिसोर्ट उभे राहिले. पर्यटन व्यवसायाची भरभराट झाली आहे. तिथल्यापेक्षा येथील निसर्ग रमणीय आहे. येथे सुविधा उपलब्ध झाल्या तर नाशिक, मुंबईचे सापुता-याला जाणारे पर्यटक भंडारद-याला येतील हे त्यांनी निदर्शनास आणून दिले. पर्यटक येथे आले, दोन दिवस येथे थांबले तर या भागाचे संपूर्ण अर्थकारण बदलून जाईल असेही त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2013 1:48 am

Web Title: chhagan bhujbal look in account of officers
टॅग : Chhagan Bhujbal
Next Stories
1 दया पवार यांचे जिल्हा परिषदेला वावडे
2 संततधारेला नगरकर आता कंटाळले
3 पाणलोट विकासासाठी ५ हजार २०० कोटी रुपये मंजूर
Just Now!
X