नागपूर सुधार प्रन्यासच्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या, १ ऑक्टोबरला नागपुरात येत असून दोन तासांच्या वास्तव्यात एकूण तीन भूमिपूजन आणि दोन लोकार्पण सोहळ्यांना उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने खासदार विलास मुत्तेमवार, मुकुल वासनिक, राज्यसभा सदस्य अजय संचेती, विजय दर्डा, अविनाश पांडे, पालकमंत्री शिवाजीराव मोघे, रोहयो मंत्री डॉ. नितीन राऊत, अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख, ऊर्जा राज्यमंत्री राजेंद्र मुळक, भाजप नेते नितीन गडकरी, आमदार देवेंद्र फडणवीस, दीनानाथ पडोळे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे अनेक लोकप्रतिनिधी एकाच व्यासपीठावर येणार आहेत.
मुख्यमंत्र्यांचे सकाळी आगमन झाल्यानंतर दुपारी २ वाजता शांतीवर चिचोली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी वामनराव गोडबोले स्मृती प्रशिक्षण केंद्र, वस्तूसंग्रहालय आणि विपश्यना केंद्राच्या प्रस्तावित इमारतीच्या भूमिपूजन समारंभात हजेरी लावतील. त्यानंतर दुपारी पावणेतीन वाजता उत्तर नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटर व गुरू गोविंदसिंग स्टेडियमचे भूमिपूजन करतील. यानंतर त्यांच्याहस्ते दुपारी ३.१५ वाजता मौजा भामटी येथील मौजा सीताबर्डी येथील मल्टिलेव्हल कार पार्किंगचे लोकार्पण होणार आहे. दुपारी ३.४५ वाजता महात्मा ज्योतिबा फुले क्रीडा संकुलाचे लोकार्पण केले जाणार आहे. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर लगेच दुपारी ४ वाजता उमरेड रोड परिसरातील मोठा ताजबाग हजरत ताजुद्दिन बाबा दग्र्याच्या सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन होणार आहे. राज्य सरकारने ताजबाग परिसरातील सौंदर्यीकरण आणि अन्य सुविधांच्या विकासासाठी २० कोटी रुपये अलीकडेच मंजूर केले आहेत.
लोकर्पण आणि भूमिपूजन सोहळ्यांचा धडाका लावून नागपूर शहरातील विकास कामांसाठी राज्य सरकार पूर्ण सहकार्य करीत असल्याचे चित्र यामुळे निर्माण करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न यशस्वी झाल्याचे समजले जात आहे. शहरातील जेएनएनयुआरएमच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी केंद्र सरकार सहकार्य करीत नसल्याचा महापालिकेतील सत्ताधारी भाजपचा आरोप आहे. तर या कामांसाठी निधी मिळूनही महापालिका योजना राबविण्यात अपयशी ठरल्याची टीका खासदार विलास मुत्तेमवार यांनी केली आहे. या पाश्र्वभूमीवर नासुप्रच्या विविध प्रकल्पांच्या माध्यमातून काँग्रेसची प्रतिमा उंचावण्यासाठी मुख्यमंत्र्यांसाठी ही चांगली संधी चालून आल्याचे बोलले जात आहे. विभागीय आयुक्त बी.व्ही. गोपाल रेड्डी, महापालिका आयुक्त श्याम वर्धने, जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्यासह स्थायी समितीचे अध्यक्ष अविनाश ठाकरे, नासुप्रचे विश्वस्त डॉ. रवी भोयर, अनंतराव घारड, किशोर कन्हेरे, रां.दा. लांडे यांचीही कार्यक्रमात उपस्थिती राहणार आहे.