राजर्षी शाहूमहाराजांच्या ऐतिहासिक कार्याचा वारसा जपण्यासाठी शाहू मिलच्या २७ एकर जागेमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य स्मारक उभे करण्यात येईल. त्यासाठी लागणारे सर्व अर्थसाहाय्य शासनाच्या वतीने दिले जाईल, अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी येथे दिली.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे कोल्हापूर जिल्हय़ाच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी शाहू मिलच्या जागेची पाहणी केली. नुकत्याच झालेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात शाहू मिलच्या जागेवर भव्य स्मारक उभारण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री चव्हाण यांनी शाहू मिलच्या २७ जागेची पाहणी केली. त्यांच्यासमवेत पालकमंत्री हर्षवर्धन पाटील, कामगारमंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, महापौर कादंबरी कवाळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मंडलिक आदी होती.
शाहू मिलच्या जागेची पाहणी केल्यानंतर तेथेच झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री चव्हाण यांनी आंतरराष्ट्रीय स्मारकाची संकल्पना पुन्हा बोलून दाखवली. ते म्हणाले, राजर्षी शाहूमहाराजांच्या सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या ऐतिहासिक सुधारणांची नोंद घेणारे हे स्मारक असणार आहे. त्यांच्या कार्याच्या स्मृती येथे जागवल्या जातील. ही जागा केवळ स्मारकासाठीच राखून ठेवली जाईल, असा निर्वाळा देऊन ते म्हणाले, या जागेत कसल्याही प्रकारचे उद्योग वा अन्य गोष्टी उभारल्या जाणार नाहीत. शाहू मिलमध्ये गारमेंट पार्क सुरू करण्याची योजना होती. आता या जागेत हे पार्क न होता ते इतरत्र उभारण्यात येईल, त्यासाठी वस्त्रोद्योग महामंडळाशी चर्चा करून लवकरच निर्णय घेतला जाईल.
शाहूमहाराजांच्या कार्याची थोरवी जगापर्यंत पोहोचावी, हा स्मारकाचा मूळ हेतू असणार आहे, असे नमूद करून चव्हाण म्हणाले, स्मारकाचा आराखडा निश्चित करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. स्मारकांतर्गत नेमक्या कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव असावा यासाठी इतिहासतज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ, अभ्यासक यांना निमंत्रित करून लवकरच एक व्यापक चर्चासत्र आयोजित केले जाणार आहे.
कसबा बावडा येथील राजर्षी शाहू जन्मस्थळाच्या विकासाच्या कामांसंदर्भात ते म्हणाले, हे काम गतीने पूर्ण व्हावे, असा शासनाचा प्रयत्न आहे. त्याकरिता १० कोटी रुपये खर्च केले जात असून ते काम लवकर पूर्ण व्हावे, असा प्रयत्न आहे. या कामांसंदर्भात असणाऱ्या काही अडचणी दूर करण्यामध्ये शासन जरूर लक्ष घालून ते सोडवेल, असेही त्यांनी आश्वासित केले.
या कार्यक्रमावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार पी. एन. पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार के. पी. पाटील, मालोजीराजे छत्रपती, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी राजाराम माने आदी उपस्थित होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 25, 2012 9:43 am