मुख्यमंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे निळवंडे धरणातून जायकवाडीसाठी अडीच टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. मात्र, निळवंडे धरणातून पाणी सोडण्यास असणाऱ्या मर्यादा लक्षात घेता निळवंडेऐवजी भंडारदरा धरणातून पाणी सोडणे अधिक योग्य ठरेल असे जाणकारांचे म्हणणे आहे. भंडारदऱ्यातून पाणी सोडल्यास तीन ते पाच दिवसांत अडीच टीएमसी पाणी सोडणे शक्य आहे. कमी वेळात अधिक वेगाने पाणी सोडल्यास पाण्याचा होणारा नाश कमी होईलच, पण अन्य उद्भवणाऱ्या अडचणींची तीव्रताही कमी होणार आहे.
निळवंडे धरणातून अडीच टीएमसी पाणी सोडण्याच्या दृष्टीने प्रशासनाने नियोजन सुरु केले आहे. मात्र निळवंडेपासून जायकवाडीपर्यंतचे अंतर १६५ किमी आहे. प्रवरा नदीवर चौदा कोल्हापूर पध्दतीचे बंधारे आहेत. ओझरच्या खाली यावर्षी प्रवरा नदी वाहिलीच नाही. गोदावरीचे पात्रही आता कोरडे पडले आहे. पाणी सोडण्याच्या कालावधीत पूर्ण २४  तास भारनियमन करणे शक्य नाही या सर्व बाबी लक्षात घेता पाण्याचा मोठय़ा प्रमाणात नाश होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. निळवंडे धरणातून प्रवरा नदीपात्रात पाणी सोडण्यासाठी एकच मोरी असून त्यातून जास्तीत जास्त १ हजार ७६४ क्युसेक्सने पाणी सोडता येते त्यामुळे निळवंडेतून पाणी सोडल्यास सुमारे साडेसतराशे क्युसेक्सने पाणी सोडले जाईल. एवढय़ा कमी क्षमतेने पाणी सोडल्यास त्यातील किती पाणी जायकवाडीपर्यंत पोहोचेल याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. त्यामुळे पाणी सोडण्याचे योग्य नियोजन न झाल्यास ना प्रवरेच्या लाभक्षेत्राला फायदा, ना मराठवाडय़ाला पिण्याचे पाणी अशी अवस्था होण्याची शक्यता आहे.
भंडारदरा धरणातून मात्र अधिक क्षमतेने पाणी सोडणे शक्य असल्यामुळे कमी वेळात पाणी जायकवाडीपर्यंत नेणे शक्य आहे. निळवंडे धरणात यावर्षी ४ हजार ७५० द. ल. घ.फू. पाणी अडवता येणे शक्य होते. सध्या धरणातील पाणीसाठा ४ हजार ५०० द. ल. घ. फू. पेक्षा अधिक आहे. भंडारदरा धरणाच्या स्पीलवेमधून ५४ हजार क्युसेक्स क्षमतेने पाणी सोडण्याची व्यवस्था आहे. धरणातील सुमारे चार ते साडेचार टीएमसी पाणी स्पीलवेमधून सोडता येऊ शकते. ११ हजार ३९ द. ल. घ. फू. क्षमतेचे भंडारदरा धरण सध्या काठोकाठ भरलेले आहे, त्यामुळे धरणातून अधिक क्षमतेने पाणी सोडल्यास काही तासातच निळवंडे धरण ओव्हरफ्लो होईल व भंडारदऱ्यातून जेवढय़ा क्षमतेने पाणी सोडले जाईल त्याच क्षमतेने निळवंडेच्या सांडव्यावरुन पाणी प्रवरा नदीपात्रात पडेल.  पाच हजार क्युसेक्सने भंडारदऱ्यातून पाणी सोडल्यास अडीच टीएमसी पाणी सोडण्यासाठी सुमारे सहा दिवस लागतील, तर दहा हजार क्युसेक्सने अवघ्या तीन-साडेतीन दिवसात पाणी सोडणे शक्य आहे. अधिक क्षमतेने पाणी सोडल्यास ते जायकवाडीला पोहचताना पाण्याचा किमान अपव्यय होईल व आवश्यक तेवढे पाणी जायकवाडीला पोहचू शकेल. भंडारदरा आणि निळवंडे धरणाच्या पाण्याचे नियंत्रण सध्या निळवंडे धरणातूनच केले जाते. त्यामुळे भंडारदऱ्याच्या पहिल्या आवर्तनात निळवंडे धरणाचे पाणी उपयोगात आणता येईल.  फक्त निळवंडे धरणातूनच पाणी सोडल्यास हे आवर्तन सतरा ते अठरा दिवस सुरु ठेवावे लागेल. तेवढय़ा काळात नदीकाठच्या सुमारे ५० गावांतील वीजपुरवठा २०-२२  तास खंडीत करावा लागेल. शिवाय ठिकठिकाणी शेतकऱ्याकंडून बंधाऱ्यात फळ्या टाकून पाणी अडविण्याचा प्रयत्न होईल. मागील वर्षी ओझर बंधाऱ्याच्या खाली प्रवरा नदीपात्रात पाणी सोडले होते. ६०० द. ल. घ. फू. पाणी सोडण्याचे नियोजन होते प्रत्यक्षात १२०० द. ल. घ. फू. पाणी खर्ची पडले. त्याच इतिहासाची पुनरावृत्ती जायकवाडीला पाणी सोडताना होण्याची शक्यता लक्षात घेऊन जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी पाणी सोडण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे.  भंडारदरा धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर वीजनिर्मिती केली जाते. धरणाच्या पायथ्याशी १२ मेगावॅट, तर कोदणी येथे ३४ मेगावॅट असे दोन जलविद्युत प्रकल्प आहेत. त्यातून दिवसभरात सुमारे साडेचार ते पाच लाख युनिट वीजनिर्मिती होते. या दोन्ही प्रकल्पांचे खाजगीकरण करण्यात आले आहे. भंडारदरा धरणातील पाणी स्पीलवे मधून सोडल्यास त्याचा फटका काही प्रमाणात वीजनिर्मितीलाही बसण्याची शक्यता आहे. तसे झाले तर संबंधित कंपनीला यात काही प्रमाणात नुकसानभरपाईही द्यावी लागेल. मात्र, आज दुष्काळी भागाला पिण्यासाठी पाणी पुरविणे ही बाब महत्वाची आहे. त्यामुळे वीजनिर्मितीवर फारसा परिणाम होऊ न देता पाण्याचा किमान नाश होऊन अधिकाधिक पाणी कमी वेळात जायकवाडीला कसे पोहचेल यादृष्टीने नियोजन होणे आवश्यक आहे.     
औरंगाबादला आज बैठक
श्रीरामपूर- निळवंडे धरणातून जायकवाडीत पाणी सोडण्यासाठी उद्या (मंगळवार) औरंगाबाद येथे गोदावरी खोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक हिरालाल मेंढिगिरी यांनी बैठक बोलावली असून तांत्रिक बाबींच्या पूर्तता करण्यासाठी किमान पाच दिवसांचा कालावधी लागणार आहे. प्रवरा नदीकाठच्या गावातील वीजपुरवठा दिवसातून चार ते सहा तासच बंद ठेवावा, असे काही अधिकाऱ्यांचे मत असून उद्याच्या बैठकीत त्यावर निर्णय होईल.
जायकवाडीत पाणी सोडताना प्रवरा नदीकाठचा वीजपुरवठा २२ तास बंद ठेवावा, अशी मागणी औरंगाबादच्या जलसंपदा विभागातील काही अधिकाऱ्यांनी केली होती. पण आज अधीक्षक अभियंता मनोहर पोकळे यांच्या उपस्थितीत नाशिक येथे बैठक झाली. नदीकाठच्या भागात केवळ दोन तास वीजपुरवठा दिला, तर तेथील जनजीवन विस्कळीत होईल. लोकांच्या भावनांचा उद्रेक होईल.