20 September 2020

News Flash

..आणि त्या मुलांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले

मुलाचे नाव घेऊन बोलावले जात होते.. प्रत्येकाला भेटवस्तू दिली जात होती.. भेटवस्तू मिळताच त्या मुलांच्या चेहऱ्यावर हास्य उमटत होते..

| February 18, 2014 08:46 am

मेडिकलमध्ये जागतिक बाल कर्करोग दिन संपन्न
मुलाचे नाव घेऊन बोलावले जात होते.. प्रत्येकाला भेटवस्तू दिली जात होती.. भेटवस्तू मिळताच त्या मुलांच्या चेहऱ्यावर हास्य उमटत होते..
हे दृष्य शनिवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) कर्करोग विभागात बघावयास मिळाले. जागतिक बाल कर्करोग दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आजारामुळे ढासळलेल्या मुलांच्या पालकांना धीर मिळावा, कर्करोगाविषयी जनजागृती व्हावी, या उद्देशाने कर्करोग विभाग प्रमुख डॉ. के.एम. कांबळे यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालरोग तज्ज्ञ डॉ. डी.एस. राऊत होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. तिरपुडे, ‘अफवा’च्या अध्यक्षा शशी सिंग, जयका मोटर्सचे संचालक कुमार काळे, ‘स्नेहांचल’चे संचालक जिम्मी राणा आणि अधीक्षक डॉ. अपूर्व पावडे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते या मुलांना विविध संस्थेतर्फे खेळणी, फळे, औषधे, शालोपयोगी साहित्य देण्यात आले. कर्करोग विभागात उपचारासाठी येणाऱ्या व दाखल असलेल्या मुलांच्या मनोरंजनासाठी नागपूर ग्रुप ऑफ फ्रेन्डस् या संस्थेने दूरदर्शन संच भेट देण्याची घोषणा केली. समर्पण या संस्थेने फळे दिलीत. वायुदलातर्फेही मुलांना भेट वस्तू दिल्या. या भेट वस्तू मिळाल्याने अन्य दिवशी निराश दिसणाऱ्या चेहऱ्यावर हास्य उमटत होते. साहजिकच उपस्थित असलेल्या पालकांमध्येही नवीन उत्साह दिसून येत होता. यानिमित्त कर्करोगग्रस्त मुलांच्या औषधोपचारासाठी मदत निधी गोळा करण्यात आला. यावेळी याच विभागात काम करत असलेल्या विद्या नावाच्या चतुर्थश्रेणी कर्मचारी महिलेने एक हजार रुपये देऊन आपल्या दातृत्वाचा परिचय करून दिला. यानंतर प्रत्येकाने आपल्या परीने मदत करून या कार्यास हातभार लावला.

या कार्यक्रमास शहर व शहराबाहेरून पाच ते चौदा या वयोगटातील ३० कर्करोग मुले-मुली पालकांसह आवर्जून उपस्थित होते. दुपारी या मुलांना भोजन देण्यात आले. यानंतर त्यांना महाराजबागेत नेण्यात आले. कर्करोगग्रस्त मुले आणि त्यांच्या कुटुंबांना आधार देण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या ‘कॅनकिडस् डिस्कॅन’ ही संस्था या मुलांच्या चेहऱ्यावर हास्य उमटवण्यासाठी नेहमीच तन-मन-धनाने प्रयत्न करत असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2014 8:46 am

Web Title: child cancer day celebration in nagpur
टॅग Nagpur
Next Stories
1 डाकसेवक आजपासून संपावर
2 राष्ट्रीय हरित प्राधिकरणाची महाजेनकोला नोटीस
3 ‘माझे शिकविण्याचे प्रयोग’चे प्रकाशन
Just Now!
X