पंचवीस तोळे सोन्याच्या खंडणीसाठी दहा वर्षांच्या बालकाच्या खून प्रकरणाच्या तपासाचे धागेदोरे उपलब्ध करण्यात पोलिसांना गुरूवारी सायंकाळपर्यंत यश आले नव्हते. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके रवाना झाली आहेत. ओळखीच्या व्यक्तीकडून हा प्रकार घडला असावा, असे गृहीत धरून तपासाला दिशा दिली जात आहे.    
देवकर पाणंद येथे राहणाऱ्या दर्शन रोहित शहा या दहा वर्षीय मुलाच्या खुनाचा प्रकार काल उघडकीस आला. २५ तोळे सोन्याच्या खंडणीसाठी हा खून करण्यात आला होता. या खंडणी मागणीचे पत्रही शहा यांच्या दारात मिळाले होते. काल रात्री गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी शहा कुटुंबियांशी चर्चा केल्यानंतर पोलिसांना या गुन्ह्य़ाचा तपास गंभीरपूर्वक करावा, असे आदेश दिले होते.    
पोलिसांनी काल रात्रीपासूनच आरोपींच्या शोधासाठी यंत्रणा गतिमान केली होती. पोलीस उपअधीक्षक महेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे. तपासासाठी तीन पथके वेगवेगळ्या दिशेने रवाना झाली आहेत. दर्शन याचे अपहरण करणारी व्यक्ती ही ओळखीची असावी, त्याच्याकडूनच हे कृत्य झाले असावे असे गृहीत धरून तपास सुरू आहे. शहा यांच्या घरात भाडेकरू असलेला युवक बेपत्ता असल्याने त्याचाही शोध घेण्याचे काम सुरू आहे.