दुसरा जो एक होता
त्याचा जन्म प्रासादातील उद्यानात झाला होता
त्याला फक्त काव्यातला कामगार
आणि स्वप्नांच्या शेतातले ज्वारीचे कणीस ठाऊक होते..
बाबा आमटेंसारख्या ऋषीतूल्य व्यक्तिमत्त्वाच्या कर्तृत्वाने सिध्द झालेल्या शब्दांनी अनेकांना कायम प्रेरणा मिळत आली आहे. ‘ज्वाला आणि फुले’ या बाबांच्या काव्यसंग्रहातील या व अशा इतर काव्यसंग्रहांनी अनेकांना प्रेरणा मिळाली आहे व क्रियाप्रवणही केले आहे. प्रत्येक कवितेतील शब्द मंत्र बनून यावा व आयुष्य अर्थपूर्ण बनवण्याची प्रेरणा देऊन जावा, अशी बाबांची कविता ‘ज्वाला आणि फुले’ मधून वाचकाला भेटत जाते. आयुष्याच्या होमातून सिध्द झालेले हे शब्द नव्या पिढीपर्यंत पोहोचावे व बाबा आमटे नामक सेवाव्रतीशी त्यांचा परिचय व्हावा, या हेतूने बसोली ग्रुपने हा काव्यसंग्रह मुलांच्या हाती ठेवला. काव्यसंग्रहातील एका कवितेवर आपल्या कल्पनेतून चित्र रेखाटण्यास सांगण्यात आले आणि यातून सुरू झाला लहानग्यांचा बाबांपर्यंत पोहोचण्याचा प्रवास. हाती आलेल्या बाबांच्या कवितेत दडलेला अर्थ या मुलांना पूर्णपणे कळला नसेलही, पण त्या शब्दांच्या ध्वन्यर्थातून निर्माण होणाऱ्या प्रतिमांना चित्रांत बांधण्याचे संपूर्ण प्रयत्न बालचित्रकारांनी केला आहे.
त्यांची चित्रे कदाचित प्राथमिक पातळीवरची असतील, त्यातून वापरण्यात आलेल्या प्रतिमा बाळबोध असतील, पण हे सगळे त्या वयाला साजेसे असेच आहे. कदाचित त्यात लाल, पिवळा, हिरवा रंग अंमळ जास्त वापरला असेल, पण हेच रंग तर मुलांना सर्वाधिक खुणावतात. या सगळयाहून महत्त्वाचे आहे, ते कोवळया वयातील मुलांचे या कवितांपर्यंत पोहोचणे आणि या प्रकल्पातून विचार पोहोचविण्याची ही प्रक्रिया सहजपणे घडून येणार आहे.
शोषणाने जो समृध्द होतो तो समाजाला शाश्वत अंधार देतो
तुम्ही तेथे श्रमाने समृध्द व्हाल
त्यामुळे तुम्ही जाणाल की की जीवनाचे नाते
हे फुलांचे व मधमाशांचे नाते आहे
ते रक्ताचे व जळवांचे नाते आहे..
भारतीय संस्कृतीतील प्रकृतीच्या दोहनाचे सूत्र इतक्या सुंदरपणे पोचवणाऱ्या कवितांचा संस्कार बसोलीने घडवून आणला आहे. बाबांच्या कवितांचे व त्यावर रेखाटलेल्या चित्रांचे पुस्तक ‘ज्वाला आणि फुले’ याच नावाने बाबांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त बसोलीने प्रकाशित केले आहे. या शब्द-चित्रांच्या प्रकल्पात सहभागी झालेल्या प्रत्येकासाठी हा आयुष्यभर स्मरणात राहणारा ठेवा बसोली आणि चंद्रकांत चन्न्ो यांनी दिला आहे.