वेदविद्या ही तपश्चर्या आणि संस्कार असला तरी गेल्या काही वर्षांत रोजगाराचे साधन किंवा वेदांचा अभ्यास म्हणून राज्यातील विविध भागात गोरगरीब आणि मध्यमवर्गीय घराण्यातील मुले वेदविद्येच्या शिक्षणाकडे आकर्षित झाले आहेत. महाल भागातील भोसला वेद शाळेमध्ये राज्यातील विविध भागातील मुले वेदाचे अध्ययन करीत आहेत. यातील काही मुले शहरात रोजगाराच्या दृष्टीने पौरौहित्याकडे वळली आहेत.
राज्याच्या विविध भागात वेदांचे अध्यापन करणाऱ्या वेदपाठशाळा असून त्यात नागपूरच्या भोसला वेदशाळेचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. पूर्वी पौराहित्य करण्याकडे नवी पिढीचा कल फारसा नव्हता मात्र आजच्या संगणकाच्या काळात ग्रामीण आणि शहरी भागातील अनेक गोरगरीब मुले या या क्षेत्राकडे वळली असून वेदांचे शिक्षण घेत आहेत. भारताची अस्मिता आणि संस्कृतीचा विकास साधण्यासाठी गेल्या १५० वषार्ंपासून वेद वेदांत, षटशास्त्र यांच्या अध्यापनाचे कार्य ही संस्था करीत आहे. भारतीय संस्कृती आणि प्राच्यविद्या जिवंत ठेवून ती वृद्धिंगत करणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. भोसला वेदशास्त्र महाविद्यालय ही संस्था केवळ महाराष्ट्रातील नाही तर भारतातील वेदविद्या व लोकिक संस्कृत वाङ्मय शिकविण्याचे कार्य करणारी प्राचीन संस्था आहे. या संस्थेला मोठा इतिहास असून अनेकांनी या वेदशाळेतून शिक्षण घेत स्वतचा वेगळा ठसा निर्माण केला आहे.
वेदविद्येचे प्रकाण्ड पंडित वेदमूर्ती नानाशास्त्री वझे यांनी प्रारंभी ९ डिसेंबर १८७९ ला महाल भागात विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात वेद अध्यापन करणारी संस्था सुरू केली. भट्टजीशास्त्री घाटे, वेदमूर्ती कृष्णशास्त्री टोकेकर, बापूजी दातार, बाळशास्त्री घाटे, कृष्णशास्त्री घुले, नारायणशास्त्री आर्वीकर, केशवशास्त्री ताम्हण, महापंडित मुरलीधरशास्त्री पाठक, वेदमूर्ती नानाशास्त्री मुळे इत्यादी विद्वान या संस्थेतून घडले आहेत.  तात्यासाहेब गुजर, धर्मवीर डॉ. मुजे, लोकनायक बापूजी अणे, माधवराव किनखेडे, डी. लक्ष्मीनारायण इत्यादी वेदप्रेमींनी त्यावेळी  संस्थेला मदत केली होती. १९३० मध्ये संस्थेला संस्कृत महाविद्यालयाचे स्वरूप प्राप्त झाले. १८ डिसेंबरला १९६० ला तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या उपस्थित संस्थेचा शताब्दी महोत्सव साजरा करण्यात आला होता. भोसला वेद शाळेत सध्या मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील सात विद्यार्थी सध्या शिक्षण घेत आहे तर २२ मुले शिक्षण घेऊन व्यवसायाच्या दृष्टीने कामाला लागली आहेत.
 वेदमूर्ती राधेश्याम पाठक, वेदमूर्ती गोविंदशास्त्री पत्राळे या वेदशाळेत अध्यापन करीत आहेत. पूर्वी पूजा पाठ करणाऱ्यांमध्ये ज्येष्ठ पिढीचा सहभाग जास्त असे. मात्र, आज या  क्षेत्रात युवकांची संख्या मोठया प्रमाणात वाढली आहे आणि ही स्वागतार्ह बाब आहे. प्रत्येक धर्माची परंपरा आणि संस्कृती वेगळी असल्यामुळे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने त्या त्या धर्माचे शिक्षण देत असतात आणि त्यात वावगे काही नसल्याचे मत व्यक्त केले. भोसला वेद शाळेमध्ये २००७ पासून गुरुकुल पद्धतीने निवासी वेदवेदांग पाठशाळेचे कार्य सुरू असून अनेक युवक त्याकडे आकर्षित होऊन शिक्षण घेत आहेत.
 या संदर्भात भोसला वेद शाळेचे कोषाध्यक्ष शेखर चिंचाळकर यांनी सांगितले, वेदपठण किंवा वेदवेदांगचे शिक्षण घेण्यासाठी राज्यातील विविध भागातील युवक वेद शाळेत प्रवेश घेण्यासाठी येत असल्यामुळे त्यांच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था संस्थेतर्फे केली जाते. नवीन पिढी याकडे आकर्षित होत आहे. पौराहित्य करणे हा व्यवसाय असला तरी तो हिंदू संस्कृतीमधील एक संस्कार आहे.
अनेक जण नोकऱ्या सोडून या क्षेत्राकडे येत आहे. पूजापाठाचा अभ्यास करीत आहेत, पण हा अभ्यास केवळ दोन तीन महिन्यांचा नसून ती तपश्चर्या आहे. पौराहित्य करणाऱ्यांना संस्कृत भाषेची जाण असणे आवश्यक आहे.