० लहान मुलांच्या वाहिन्यांवर नवनवीन कार्यक्रम
 ० वेगवेगळ्या स्पर्धामधूनही करमणुकीची हमी
उन्हाळ्याची सुट्टी पडली आहे, कोणत्याही संस्कार शिबिरात वगैरे प्रवेश मिळत नाही, आणि आईवडील कामावर गेल्यानंतर खेळायलाही कोणीच नाही? अशा परिस्थितीत अडकले असाल, तर मग तुम्हाला कार्टून चॅनल्सचा सॉलिड आधार आहे. येत्या उन्हाळ्याच्या सुट्टीत बच्चेकंपनीला डोळ्यासमोर ठेवून ‘पोगो’, ‘डिस्ने’ आणि ‘कार्टून नेटवर्क’ या वाहिन्यांनी एकापेक्षा एक सरस कार्यक्रम आणले आहेत. विशेष म्हणजे या वाहिन्यांनी फक्त कार्यक्रमांपुरते मर्यादित न राहता विविध स्पर्धाच्या माध्यमातूनही बच्चेकंपनीला गुंतवून ठेवण्याचे ठरवले आहे.
भारतातल्या तमाम लहान मुलांना शक्ती देणारे लाडू खायला शिकवणाऱ्या छोटय़ा भीमचा वाढदिवस साजरा करायला ‘पोगो’ वाहिनी सज्ज झाली आहे. लोकप्रियतेच्या शर्यतीत डोरेमॉनलाही मागे टाकणाऱ्या छोटय़ा भीमचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पोगोने खास ‘छोटा भीम अ‍ॅण्ड द क्राऊन ऑफ वल्हल्ला’ हा चित्रपट तयार केला आहे. १ मे रोजी दुपारी १२ वाजता दाखवल्या जाणाऱ्या या चित्रपटात बच्चेकंपनीला छोटा भीम आणि त्याच्या मित्रांचे आणखी एक साहस पाहण्याची संधी मिळेल. त्याशिवाय ‘भीम का बड्डा पार्टी’ या नावाची एक स्पर्धाही पोगोने आयोजित केली आहे. या स्पर्धेच्या पाच विजेत्यांबरोबर त्यांच्या वाढदिवसाला त्यांच्या घरी छोटा भीम पार्टी करेल. त्याच्यासह त्याचे मित्रही या पार्टीत सहभागी होणार आहेत. त्याशिवाय लहानग्यांचा आवडता ‘मायटी राजू’देखील एका नव्या चित्रपटाद्वारे त्यांच्या भेटीला येणार आहे.
लहान मुलांना आपल्या वाहिनीवर खिळवून ठेवण्यासाठी ‘डिस्ने’ने आपली ‘जेट सेट’ ही स्पर्धा पुन्हा सुरू केली आहे. ‘डिस्ने’ वाहिनीवरील कार्यक्रमांदरम्यान टीव्हीवर दिसणारे जेट विमान जास्तीत जास्त वेळा बघून एका क्रमांकावर फोन करणाऱ्यांना डिस्ने हाँगकाँग येथील डिस्नेलँडची सफर घडवणार आहे. त्याशिवाय डिस्ने हळूहळू इतरही कार्यक्रम सुरू करण्याच्या विचारात आहे.
सुरुवातीपासूनच बच्चेकंपनीची सर्वात आवडती वाहिनी असलेल्या ‘कार्टून नेटवर्क’वर या उन्हाळ्यात ‘ओगी अ‍ॅण्ड द कॉक्रोचेस-४’ हा कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार दुपारी ३ वाजता दाखवण्यात येईल. त्याशिवाय ‘काटरून नेटवर्क पॉपकॉर्न’च्या माध्यमातून दर शनिवारी दुपारी १२ वाजता एक नवीन चित्रपट दाखवण्यात येईल. यात ‘बाटू गायडेन’, ‘क्रिश ट्रिश बाल्टीबॉय – ४’, ‘चटपट झटपट’, ‘टॉम अ‍ॅण्ड जेरी मीट्स शेरलॉक होम्स’ अशा धम्माल चित्रपटांचा समावेश आहे. तसेच कार्टून नेटवर्कही ‘ओगी फन इन द सन’ ही स्पर्धा घेणार आहे.