वैज्ञानिक प्रयोगांची उकल करणे अथवा समजावून घेणे हा विषयच किचकट. विज्ञानातील सिध्दांत, वेगवेगळ्या संकल्पना, विविध प्रयोगांती दैनंदिन जीवनात घडणारे आविष्कार, ही खरेतर वेगळीच दुनिया. सर्वसामान्यांना काहिशा क्लिष्ट वाटणाऱ्या या वैज्ञानिक जगतात नाशिक जिल्ह्यातील हजारो बालके रममाण झाल्याचे पुढे आले आहे. शालेय जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा म्हणून शासनाने राबविलेल्या ‘इन्स्पायरल अवार्ड’ शिष्यवृत्तीसाठी थोडेथोडके नव्हे तर, तब्बल १,६३४ विद्यार्थ्यांची निवड हे त्याचे निदर्शक.
याच उपक्रमातंर्गत १२ विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर चमक दाखविली. शाळा आणि खासगी विज्ञान संस्थांच्या माध्यमातून हे बाल वैज्ञानिक सौर उर्जेवर चालणारी सायकल, छोटे यंत्रमानव, दूरनियंत्रकाच्या सहाय्याने चालणारी होडी, दूरदर्शिका असे नानाविध छोटे-मोठे प्रकल्प साकारत या क्षेत्रात नाशिकचे नांव उज्ज्वल करण्याच्या मार्गावर आहेत.
दैनंदिन जीवनातील समस्या हा तर बाल वैज्ञानिकांसाठी जणू प्रयोगांचा खजिनाच. भारनियमन, इंधन दरवाढ, सार्वजनिक ठिकाणी पडलेला कचरा, पाणी टंचाई व प्रदूषण, महिलांवरील अत्याचार, टोल वसुलीवरून होणारे वाद, वाहनांचे अपघात अशा एक ना अनेक प्रश्नांवर विज्ञानाच्या मदतीने तोडगा काढण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे हे विशेष. विद्यार्थी दशेत या प्रश्नांची त्यांना जाणीव व्हावी, त्यासंदर्भात त्यांच्याकडून काही पर्याय सुचविले जातात का याची चाचपणी करण्यासाठी राज्य शासन विविध माध्यमातून प्रयत्न करत आहे. शैक्षणिक अभ्यासक्रमात माध्यमिक विभागासाठी विविध उपक्रम राबविले जातात. शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट विज्ञान विषयात लेखी माहितीवर भर दिला गेला आहे. त्यात सांगितलेले प्रयोग, त्याचे प्रात्यक्षिक, परिणाम, विज्ञानाच्या संकल्पना, रासायनिक समीकरणे आदिंचा समावेश आहे. प्रयोगशाळेत काही अंशी प्रात्यक्षिकांवर भर दिला जातो. मात्र त्याची सांगड घालून दैनंदिन जीवनातील समस्यांवर काही उपाय शोधता येतात का, यासाठी खास शालेय विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रदर्शनांची संकल्पना मांडण्यात आली. या प्रदर्शनाला शहरी व ग्रामीण भागातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
मागील दोन ते तीन वर्षांतील विज्ञान प्रदर्शनांचा आढावा घेतल्यास विविध प्रयोगांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन  संशोधनवृत्ती वाढीस लागल्याचे लक्षात येते. डोंगरावर फिरताना दिसणाऱ्या पवन चक्क्यांची प्रतिकृती तयार करताना हे विद्यार्थी त्याची कार्यपद्धतीही समजावून सांगतात. पुस्तकात शिकलेली ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही संकल्पना, प्लास्टिक कागद व टपच्या मदतीने ‘शेत तळे’ कसे करता येईल, सौर उर्जेचा वापर स्वयंचलित वाहनासाठी
कसा करता येऊ शकतो, बोगद्यातील संकटाची पूर्व सूचना देण्यासाठी

सौरउर्जेचा कसा वापर करता येईल अशा अनेक कल्पना या बाल वैज्ञानिकांनी प्रत्यक्षात साकारल्या आहेत. अवकाशात सोडल्या जाणाऱ्या उपग्रहाची प्रतिकृती बनविताना त्यात वापरले जाणारे घटक, त्यामागील शास्त्रीय कारणे यावर त्यांच्याकडून भर दिला जात आहे. विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन वृध्दिंगत करण्यासाठी केंद्र शासनाने ‘इन्स्पायरल अ‍ॅवार्ड’ ही शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृिष्टकोन विकसित व्हावा आणि त्यांनी संशोधनासाठी प्रयत्न करावेत या उद्देशाने प्रत्येक शाळेतील इयत्ता सहावी ते आठवी या गटातून एक आणि नववी व १०वीमधून एक अशा दोन विद्यार्थ्यांची निवड केली जाते. निवड झालेल्या विद्यार्थ्यांला प्रत्येकी पाच हजार रुपयांची शिष्यवृत्ती पुरस्कार स्वरूपात दिली जाते. ही निवड शाळेमार्फत मुलांमधील आवड लक्षात घेऊन करण्यात येते. आजवर या शिष्यवृत्तीचा एक हजार ६३४ विद्यार्थ्यांना लाभ मिळाला आहे. जिल्हास्तरावर निवड झालेल्या १२ विद्यार्थ्यांचे प्रयोग राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात गौरविले गेले आहेत.
याच बरोबरीने खासगी संस्थांच्या मदतीने विज्ञानाचे धडे गिरविले जात आहेत. नाशिक प्रबोधिनी संस्थेमार्फत ‘ेसन्डे सायन्स स्कूल’ हा अभिनव उपक्रम सुरू आहे. रविवारी दोन तास भरणाऱ्या शाळेत इंग्रजी व मराठी दोन्ही माध्यमांची मुले पाठय़पुस्तकात शिकलेले वेगवेगळे प्रयोग साकारत आहेत.
इयत्ता तीसरीपासून ते १० वीपर्यंतची २३४ विद्यार्थी वैयक्तिक स्तरावर हे प्रयोग करतात. तसेच बाल वैज्ञानिकांच्या संघाने पिण्याच्या पाण्याच्या टाकाऊ बाटल्यांपासून या अनोख्या होडीचा आविष्कार केला आहे. विज्ञानाच्या वेगवेगळ्या संकल्पनांविषयी अवगत करून त्या आधारे सौर उर्जेवर चालणारी सायकल, छोटे यंत्रमानव, दूरनियंत्रकाच्या सहाय्याने चालणारी होडी, दूरदर्शिका असे नानाविध छोटे-मोठे प्रकल्प साकारले जात आहेत.