4शस्त्रास्त्रांचा खजिना
राजस्थानातील विविध वस्तू, वाद्य्ो, वस्त्रे पाहायची असतील तर एक छोटेसे वस्तुसंग्रहालयही येथे उभारण्यात आले आहे. तिथे जुनाट टाळे, शस्त्रास्त्रे, भांडी पाहायला मिळतात. राजस्थानी सरदार वापरत असलेल्या तलवारी, गुप्ती, ढाल आदी पाहताना राजस्थानचा शूरवीर इतिहास डोळय़ासमोर उभा राहतो.

रंगबेरंगी घरे, राजस्थानी लोककला, लोकनृत्ये, हस्तशिल्पे, उंटावरची सफर आणि सोबत राजस्थानी स्वादमेवा.. राजस्थानमधील एखाद्या गावामध्ये आल्याचे वाटतेय ना.. होय, हे राजस्थानातीलच गाव आहे, पण ते आहे भिवंडीजवळ. संस्कृती, लोककला, लोकनृत्ये, हस्तशिल्प आणि मधुर भाषेची गौरवशाली परंपरा लाभलेल्या राजस्थानातील उज्ज्वल परंपरा आणि लोकसंस्कृती जाणून घेण्यासाठी आणि एक दिवसाची मौजमजा करण्यासाठी मुंबई-आग्रा महामार्गावर भिवंडीजवळ एक राजस्थानी गाव साकारले आहे.
‘चोकी धानी’नामक या गावात प्रवेश केल्यास तुम्ही महाराष्ट्रात आहात की राजस्थानात हेच समजणार नाही. तिथे स्वागतच राजस्थानातील पारंपरिक पद्धतीने होते. ललाटी टिळा लावून अन् डोईवर पुष्प वाहून राजस्थानी वेशभूषेतील जोडपे तुमचे स्वागत करते. आतमध्ये विविध स्टॉल्सवर तुम्हाला लोकपरंपरा अनुभवावयास मिळते.. कुठे राजस्थानी नृत्यांगना ‘घागरा जो घुम्यो’ म्हणत काल्बेलिया नृत्य करत असतात.. तर कुठे राजस्थानी ढोल, एकतारी व अन्य वाद्य्ो वाजवत वातावरण संगीतमय करणारे वादक. हिंदी चित्रपटातील गाण्यांवर नाचणाऱ्या कठपुतळ्यांचा खेळ तर या आनंदात आणखी भर टाकतो. भोपा-भोपी नृत्य, सर्प नृत्य, घुमर आदी नृत्यकला मन मोहून टाकतात. पुंगी आणि ढोलकच्या तालावर नाचणारा साप हे पाहताना आपले डोळे आपसूक विस्फारतात.
या गावातील मालिशवाल्याकडून डोक्याला मालिश करून घेतल्यास स्वर्गीय आनंदच मिळतो. मेहंदी हा तर महिलांचा आवडता प्रकार.. त्याची सोय येथे आहे. राजस्थानी वेशेभूषेतील महिला येथे पारंपरिक पद्धतीची मेहंदी काढून देते. ‘उंटावरचा शहाणा’ ही म्हण आपल्याकडे प्रसिद्ध असली तरी उंटावरून रपेट करायला सर्वानाच आवडते. या गावात त्यासाठी विशेष सोय करण्यात आली आहे. उंटावर बसून या गावातून फेरफटका मारायला कुणाला आवडणार नाही?
खरी मज्जा आहे, ती राजस्थानी पदार्थ चाखण्याची. ‘चोकी धानी’मध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला ‘बाजरी की रोटी’, ‘लसूण चटणी’ आणि ‘गूळ’ मिळेल. ही लसूण चटणी मराठमोळी नसेल, तर खास राजस्थानी पद्धतीची. बाजवर (राजस्थानी पलंग) बसून ती चाखण्याची मजा काही औरच. तेथील भोजनकक्षात प्रवेश केला तर तुपकट सुगंधानेच मन भरून येईल. प्रत्येक पदार्थ साजुक तुपात घोळलेला.. दाल बाटी, चुर्मा, संगरी, लाप्शी, मख्खन धानी रो, बुरा, मालपोवा, साग कडी बेसनारी, साग दाल पछमेल्री, लस्सी, जिलेबी आदी पदार्थाचा आस्वाद घेताना रसनातृप्ती मिळते अन् ‘दाल बाटी, चुर्मा और राजस्थान सूरमा’ हे शब्द आपसूक ओठांवर येतात.
संदीप नलावडे

चोकी धानी
* कुठे : मुंबई-आग्रा महामार्गावर भिवंडीजवळ (कल्याणपासून साडेसहा किलोमीटर अंतरावर)
* कसे जाल? : ठाण्याहून तीन-हात नाका येथून रिक्शाने किंवा बसने जाता येईल. कल्याणहून रिक्शाने किंवा बसने केवळ २० मिनिटे अंतरावर. केडीएमसीच्या बस सतत भिवंडीला सुटत असतात.
* काय आस्वाद घ्याल? : राजस्थानातील पारंपरिक नृत्यकला (घुमर, पॉटर डान्स, काल्बेलिया नृत्य, नाग नृत्य, भोपा-भोपी नृत्य, नाट रो करताब), राजस्थानातील संगीत, कठपुतळ्यांचा खेळ, कुंभारकला, जादूचा खेळ, साप-शिडीचा खेळ, डोक्याची मालीश, मेंहदी, उंट, घोडागाडी, बैलगाडीतून रपेट, राजस्थानी पदार्थाचा आस्वाद
* शुल्क : ५०० रुपये
* वेळ : सायं. ५ ते ११
शालेय सहलींसाठी : स. ९.३० ते ३.३०