बालनाटय़ांमधून पऱ्या, जादूगार वगैरेंची सुट्टी
एकेकाळी मुलांच्या भावविश्वात महत्त्वाचे स्थान असलेल्या पऱ्या, बोलके बाहुले, जादूगार, जंगलातले प्राणी वगैरेंची सध्या हकालपट्टी झाली असून त्यांची जागा छोटय़ा पडद्यावरील शिनचॅन, छोटा भीम, बाल हनुमान, डोरेमॉन वगैरेंनी घेतली आहे. त्यामुळे मुलांच्या भावविश्वाचे प्रतिबिंब असलेल्या बालनाटय़ांमध्येही याच सगळ्या ‘कॅरेक्टर्स’नी धुडगूस घालायला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे मुलांना हेच पाहायला आवडते, अशी भलामण करत बालनाटय़ निर्मातेही अशीच नाटके करण्यावर भर देत आहेत. यंदा आलेल्या बालनाटय़ांपैकी तब्बल ११ नाटके ‘कार्टून कॅरेक्टर्स’वर आधारित आहेत.
रत्नाकर मतकरी, प्रवीण दवणे यांच्यासारख्या लेखकांनी एकेकाळी गाजवलेल्या बालनाटय़सृष्टीत पुढे चेटकीण, परी, जादूगार, बोलणारी खेळणी वगैरेंचा प्रवेश झाला. एक दोन वर्षांपूर्वी टीव्हीवरील कार्टून मालिकांमधील काही पात्रांचा समावेश या बालनाटय़ांत झाला. मात्र यंदा तर १५ पैकी ११ नाटकांमध्ये शिनचॅन, डोरेमॉन, छोटा भीम, लिटिल कृष्णा, बाल हनुमान अशा कार्टून पात्रांचा समावेश आहे. विशेष म्हणजे दोन बालनाटय़ांमध्ये ‘चुलबुल’ची धमालही अनुभवायला मिळत आहे.
याबाबत ‘चिल्ड्रेन थिएटर्स’चे राजू तुलालवार यांना विचारले असता त्यांनी पालकांकडे अंगुलीनिर्देश केला. पालक मुलांना काय पाहायचे आहे, असे विचारतात. मुलेही मग कार्टून पात्रांचा समावेश असलेल्या नाटकांकडे बोट दाखवतात. व्यावसायिक स्पर्धेत टिकायचे असेल, तर मुलांना आवडते ते दाखवले पाहिजे. मात्र त्यातूनही आपण मुलांना काय धडा देऊ शकतो, याकडे आपला कल असतो, असेही ते म्हणाले.
यंदा एकाही कार्टून पात्राची मदत न घेता स्वामी विवेकानंदांचे आयुष्य बालनाटय़ाच्या माध्यमातून साकारणाऱ्या अरुंधती भालेराव यांना मात्र व्यावसायिकतेचा निकष पटत नाही. सध्याच्या काळातील मुले खूपच हुषार आहेत. आपण त्यांना दाखवू, ते ते आत्मसात करतात. त्यामुळे त्यांना सकस मनोरंजन देणे ही आपली जबाबदारी आहे, असे मत भालेराव यांनी व्यक्त केले.
कार्टून पात्रे घेऊन येणारी बहुतांश बालनाटय़े आमची निराशा करणारी ठरतात, असा सूर काही मुलांनी लावला. टीव्हीमुळे आमच्या आवडीचे असलेले कार्टून पात्र रंगमंचावर मात्र आम्हाला तेवढे आवडत नाही, असे ओंकार जोशी याने सांगितले. टीव्हीवरचा छोटा भीम खूप ताकदवान आहे. पण नाटकातला भीम काही ग्रेट करत नाही, असेही त्याने आणि त्याच्या मित्रांनी सांगितले.
‘कार्टून’मय बालनाटय़े
छोटा भीम झिंदाबाद, शिनचॅन वर्सेस लिटिल कृष्णा, वीर छोटा भीम, हसवणारा चुलबुल, अँग्री बर्ड्स शिकवणार धडा, डोरेमॉन भीम, निंजाटॉम जंगली बाणा, हॅप्पी बर्थडे शिनचॅन, गब्बरच्या जंगला डोरेमॉन, बलवान भीम आणि हनुमान, भांडखोर टॉम मस्तीखोर जेरी.

छोटा भीम, शिनचॅनचा रंगमंचावरही धुडगूस