News Flash

बहुश्रुत, व्यासंगी!

‘हाडा’चा हा शब्दप्रयोग जणूकाही हेटाळणी केल्यासारखा वापरला जातो. परंतु लढवय्ये पत्रकार व विकास चळवळीतील कृतिशील व्यक्तिमत्त्व असलेल्या सुधाकरराव डोईफोडे यांच्याबाबत मात्र ‘हाडाचा पत्रकार’ हे

| September 28, 2013 01:56 am

हाडाचा शिक्षक, पत्रकार म्हटले की त्याच्याबद्दल आदरयुक्त भावना निर्माण होते, पण आता ‘हाडा’चा हा शब्दप्रयोग जणूकाही हेटाळणी केल्यासारखा वापरला जातो. परंतु लढवय्ये पत्रकार व विकास चळवळीतील कृतिशील व्यक्तिमत्त्व असलेल्या सुधाकरराव डोईफोडे यांच्याबाबत मात्र ‘हाडाचा पत्रकार’ हे संबोधन चपखल बसणारे आहे. वयाच्या बाराव्या वर्षी वृत्तपत्रीय लेखनाचा श्रीगणेशा करणाऱ्या डोईफोडे यांनी १९५६ मध्ये म्हणजे वयाच्या १९व्या वर्षी ‘लोकसत्ता’चे वार्ताहर म्हणून कारकीर्द सुरू केली. तेव्हापासून त्यांचा प्रवास विविधांगी अनुभवांची शिदोरी गोळा करीत सुरूच आहे.
मराठवाडय़ातील ज्येष्ठ पत्रकार व विकास चळवळीतील कृतिशील व्यक्तिमत्त्व म्हणून डोईफोडे यांनी प्रामुख्याने गेल्या दोन दशकांत वेगळा ठसा उमटविला. या दरम्यान त्यांना विविध मानसन्मान मिळाले. आताही स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मानाच्या पुरस्काराची यात नव्याने भर पडली. विद्यापीठाने त्यांचा जीवनगौरव करावा ही बाब औचित्यपूर्णच आहे. डोईफोडे यांचे महाविद्यालयीन शिक्षण स्वामीजींनी स्थापन केलेल्या पीपल्स कॉलेजमध्येच झाले. या थोर सेनानीने समाजात रुजविलेली मूल्ये आजवर पाळून त्यांनी वयाचा अमृतमहोत्सवी पल्ला पार केला.  
दिवंगत ज्येष्ठ पत्रकार अनंत भालेराव यांनी मराठवाडय़ाच्या पत्रकारितेत दुसरी पिढी घडविली. डोईफोडे यांना त्यांच्यासोबत कामाची संधी मिळाली नसली, तरी अनंतरावांना गुरुस्थानी मानत ‘प्रजावाणी’ दैनिकाच्या माध्यमातून पत्रकारितेत दबदबा निर्माण केला. डोईफोडे, रामेश्वर बियाणी व डॉ. देव या प्रभृतींनी पत्रकारितेचा धंदा होऊ न देण्याची पुरेपूर काळजी घेतली. डोईफोडे पुण्यातून एलएल.बी. झाले, पण पिढीजात व्यवसायाची वाट सोडून एक व्रत म्हणून पत्रकारिता स्वीकारली. अन्याय, अत्याचार, अनाचार दिसला तेथे त्यांची लेखणी तुटून पडली. याच वेळी समाजात चांगले, उदात्त दिसले त्याचा पुरस्कारही केला.  
अनंतरावांशीही एका प्रश्नावर धोरणात्मक विरोध घेत लेखणी चालविली. मराठवाडा विकास आंदोलन, आणीबाणीविरोधी आंदोलन, नामांतर लढा, रेल्वे आंदोलन, वैधानिक विकास मंडळासाठीची चळवळ या सर्व घडामोडींमध्ये डोईफोडे सातत्याने कृतिशील राहिले. पत्रकारितेचे अधिसाराव्रत पाळतानाच राजकारणातही संचार केला. नांदेडचे नगराध्यक्ष, खासदार झालेल्या व्यंकटराव तरोडेकर यांना १९६७च्या पालिका निवडणुकीत पराभूत करण्याची किमया त्यांनी केली. न.प.चे लोहिया वाचनालय नावारूपास आणण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता.  
लोकांमध्ये जाऊन व प्रश्नांच्या खोलात शिरून वेगवेगळय़ा विषयांवर, प्रश्नांवर डोईफोडे यांनी चौफेर लिखाण केले. इतिहास, राजकारण हे त्यांचे आस्थेचे विषय. निजामी राजवट बालवयात त्यांनी अनुभवली. या राजवटीचा, तसेच देशातील विविध संस्थानांचा सखोल अभ्यास केला. नांदेडची साहित्य, कला, संगीत क्षेत्राची देदीप्यमान परंपरा समृद्ध करण्यात डोईफोडे यांचे योगदान लक्षणीय आहे. मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. गोिवदभाई श्रॉफ यांच्यानंतर रेल्वेविषयक प्रश्नांचे गाढे अभ्यासक म्हणूनही डोईफोडे ओळखले जातात. पन्नासहून अधिक वर्षांची पत्रकारिता, दीर्घकालीन सामाजिक कार्यातून सुधाकरराव ‘नांदेडभूषण’ आधीच ठरले. कोणताही वारसा किंवा थेट मार्गदर्शन नसताना वाचन, व्यासंग, बहुश्रुतता व लढाऊ बाण्यातून पत्रकारितेत स्वतंत्र ओळख निर्माण केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2013 1:56 am

Web Title: churchetala chehra doiphode
Next Stories
1 दोन्ही काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांशी माजी मुख्यमंत्री चव्हाणांची चर्चा
2 जायकवाडीत दहा टीएमसी पाणी सोडण्यासाठी मध्यस्थी- आव्हाड
3 अन्न सुरक्षेमुळे लोक आळशी बनण्याची भीती- मंत्री देशमुख
Just Now!
X