मोठमोठय़ा प्रकल्पावर वारेमाप खर्च करणाऱ्या नवी मुंबई पालिकेची आर्थिक स्थिती डबघाईला आलेली असताना शहराचे शिल्पकार म्हणविणाऱ्या सिडकोचीही आर्थिक स्थिती नाजूक असल्याचे समजते. त्यामुळे साडेसात हजार कोटी रुपयांच्या ठेवी असलेल्या सिडकोला काही ठेवींची मुदत संपल्यानंतर त्यांची रक्कम दैनंदिन कामकाजासाठी वापरण्याची वेळ आली आहे. भूखंड विकण्याचा व्यवसाय सध्या मंदीत असल्याने सिडकोच्या तिजोरीत येणारी सध्या दैनंदिन आवक कमी झाली आहे. त्यात बाळगंगा, विमानतळ प्रकल्पासाठी सिडकोला हात सैल सोडावा लागत आहे.
दोनशे कोटींचे मुख्यालय, चारशे कोटींचे मलनि:सारण, सुमारे पन्नास कोटींचे वंडर पार्क यांसारख्या कोटींच्या उड्डाणांमुळे नवी मुंबई पालिकेची आर्थिक स्थिती खालावली आहे. त्यात एलबीटी बंद झाल्यानंतर पालिकेची तर दयनीय स्थिती होण्याची शक्यता आहे. याच शहरातील सिडकोची आर्थिक स्थितीही थोडीशी नरम पडली आहे. त्यामुळेच मुदत पूर्ण झालेल्या ८०० कोटींच्या ठेवी तात्काळ जास्त व्याज देणाऱ्या बँकेत न ठेवता गेली अनेक दिवस त्यातील पैसे वापरले जात असल्याचे समजते. सिडकोने विविध वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थांमध्ये साडेसात हजार कोटी रुपयांच्या ठेवी ठेवलेल्या आहेत. त्यामुळे राज्यातील एक श्रीमंत महामंडळ म्हणून सिडकोचा बोलबाला आहे, पण या श्रीमंतीला घरघर लागण्यास सुरुवात झाली असून मुदत पूर्ण झालेल्या ८०० कोटींच्या ठेवींचा पैसा सिडकोच्या दैनंदिन खर्चासाठी वापरण्यात आला आहे. यात बाळगंगा धरण प्रकल्पासाठी ४०० कोटी तर विमानतळ प्रकल्पासाठी ८० कोटी रुपये खर्चाचा सहभाग आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांचा पगार, त्यांचे निवृत्तिवेतन, भत्ते, सल्लागारांच्या सोयी-सुविधा यांवर खर्च केले जात आहेत. त्यामुळे सिडकोतही काही आलबेल नसल्याचे चित्र आहे. सिडकोने नुकतीच नेरुळ सीबीडी येथे काही भूखंड विक्रीला काढले होते. त्यांना चांगला भाव आला आहे. खारघर येथेही काही भूखंड विकले जाणार असून या विक्रीतून मिळणाऱ्या पैशातून ह्य़ा ठेवी पूर्ववत ठेवल्या जाण्याची शक्यता आहे. वास्तविक ठेवींची मुदत संपल्यानंतर लागलीच त्या जास्त व्याज देणाऱ्या वित्त संस्थेत ठेवण्याची गरज आहे, पण सिडको याबाबत निर्णय घेताना चालढकल करीत असून कोटय़वधींच्या या ठेवींवर एक दिवसाचा व्याजदेखील लाखोंच्या घरात जात आहे.