नेरुळ येथील सिडकोच्या सहायक वसाहत अधिकारी कार्यालयातील लिपिकाला दीड हजाराची लाच स्वीकारताना नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज दुपारी अटक केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईमुळे कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. लिपिकाच्या माध्यमातून छोटा मासा विभागाच्या हाती लागला असून त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यास वरिष्ठ अधिकारी हाती लागतील अशा प्रतिक्रिया त्या ठिकाणी कामानिमित्त आलेल्या काही नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.
कपिल शंकर कोळी असे या लाचखोर लिपिकाचे नाव आहे. सिडकोचे वसाहत विभाग हे क्रीमीलेअर विभाग म्हणून ओळखले जातात. या विभागात बदली मिळण्यासाठी कर्मचाऱ्यांची चढाओढ सुरू असते. या विभागात आलेल्या सामान्य नागरिकाचे काम कधीच सरळ मार्गाने होत नाही. मात्र दलालाच्या माध्यमातून आल्यास ते पटकन होत असल्याचा अनेकांचा अनुभव आहे.
यामुळेच याच कार्यालयाच्या बाजूला असलेल्या कॅटिंगमध्ये अधिकारी आणि दलालांच्या भेटीगाठी नित्याच्या आहेत. सध्या काही कनिष्ठ कर्मचारी या दलालांची भूमिका बजावत आहेत. कोळी याने सिडकोची घरासंदर्भातील ट्रान्सफर ऑर्डर देण्याकरिता एका व्यक्तीकडून दीड हजाराची लाच मागितली होती. या प्रकरणी त्यांनी नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीवरून आज अधिकाऱ्यांनी कार्यालयात सापळा लावला होता. दुपारी दीडच्या सुमारास कोळी याला तक्रारदाराकडून लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. जेवणाच्या सुट्टीच्या वेळी कोळी याला अटक झाल्याने अनेक अधिकाऱ्यांना जेवण गोड लागले नसल्याची चर्चा कार्यालयात सुरू होती.