भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना सिडकोचा दक्षता विभाग एखाद्या आरोपीप्रमाणे वागवत असून या विभागातील चौकशी अधिकारी पद्माकर जुईकर यांना तात्काळ हटविण्यात यावे, अशा मागणी घेऊन सिडको कामगार संघटनेने मंगळवारी बेलापूर येथील मुख्यालयाचे प्रवेशद्वार दणाणून सोडले. जुईकर हे एक कार्यक्षम व प्रामाणिक अधिकारी असून त्यांना हटविण्याचा प्रश्नच येत नाही, अशी भूमिका दक्षता विभागाने घेतल्याने कामगार संघटनेने प्रशासनाला दोन दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे. दरम्यान, प्रशासनाने आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल केल्याने येत्या काळात कामगार संघटना व प्रशासन असा सामना रंगणार असल्याचे दिसून येते.
सिडकोतील भ्रष्टाचार सर्वश्रुत आहे. त्यामुळेच व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी ‘भ्रष्टाचार हटाव सिडको बचाव’ अभियान सुरू केले आहे. त्यासाठी पारदर्शक कारभाराचा वीस कलमी कार्यक्रम आखण्यात आला आहे. त्यातील एक भाग म्हणून सिडकोत पहिल्यांदाच पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली दक्षता विभाग स्थापन करण्यात आला आहे. या विभागाची सूत्रे सनदी अधिकारी डॉ. प्रज्ञा सरवदे यांच्याकडे सोपविण्यात आली असून त्यांच्या हाताखाली निवृत्त साहाय्यक आयुक्त पद्माकर जुईकर हे चौकशी अधिकारी म्हणून काम करीत आहेत. सिडकोच्या अनधिकृत बांधकामविरोधी पथकातील बी. डी. कांकड यांनी लाच मागितल्याचा आरोप खारघर येथील एका चहा ठेल्यावाल्याने या विभागाकडे केला होता. त्याची चौकशी सुरू असताना जुईकर यांनी कांकड यांना खारघर येथे चार वेळा बोलावून एखाद्या आरोपीसारखे बसवून ठेवल्याचा आरोप संघटनेने केला आहे. या मानसिक त्रासाला कंटाळून त्यांनी राजीनामा दिल्याचेही संघटनेचे मत आहे. यापूर्वी गणेश घरत या कर्मचाऱ्यालाही या विभागात बोलावून बसवून ठेवण्यात आले होते. कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास देण्याचा या विभागाचा हेतू असल्याचे सचिव जी. टी. पाटील यांनी स्पष्ट केले. प्रत्येक कर्मचारी व अधिकारी भ्रष्टाचारी असल्याच्या नजरेत हा विभाग संशयाने पाहत असून कोणत्याही महामंडळात ही पद्धत नाही, असे अध्यक्ष नीलेश तांडेल यांनी स्पष्ट केले. कर्मचाऱ्यांना होणाऱ्या या त्रासाची प्रशासनाला कल्पना देण्यात आली असून गेला महिनाभर कर्मचाऱ्यांत असंतोष खदखदत होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी मंगळवारी जुईकर यांना सिडको प्रवेशबंदी केली. त्यानंतर नवीन शहर प्रशासक सुनील केंद्रेकर यांनी मध्यस्थी करून या प्रश्नावर भाटिया निर्णय घेतील असे स्पष्ट केले. त्यामुळे संघटनेने दोन दिवसांत यावर निर्णय घ्यावा, असा अल्टिमेटम दिला आहे.

सिडकोतील भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी या विभागाची स्थापना करण्यात आली असून तो कोणाच्याही दबावाखाली काम करणार नाही. भ्रष्टाचाराची तक्रार आल्यानंतर त्याची चौकशी ही होणारच. त्यात अडथळा निर्माण करण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. चौकशीसाठी कर्मचारी अधिकाऱ्यांना बोलाविण्यात येणार त्यात गैर काही नाही. चौकशी करण्याची एक पद्धत ठरलेली आहे. ती आम्ही आमच्या पद्धतीने करणार. कर्मचाऱ्यांनी उलट त्यात सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. सिडको क्लीन करण्याची जबाबदारी सर्वाचीच आहे. त्यामुळे जुईकर किंवा इतर कोणत्याही अधिकाऱ्याला हटविण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
डॉ. प्रज्ञा सरवदे, मुख्य दक्षता अधिकारी, सिडको