नवीन नाशिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिडको परिसरात अतिक्रमणांचा विषय सर्वसामान्यांसह पोलीस यंत्रणेसाठी डोकेदुखीचा ठरला आहे. काही अतिक्रमणे टवाळखोरांचा अड्डा बनली असून त्यांच्या उच्छादाचा सामना महिला व युवतींना करावा लागत आहे. या संदर्भात वारंवार तक्रारी करुनही महापालिका आणि सिडको प्रशासन परस्परांकडे बोट दाखवून टोलवाटोलवी करते. परिणामी, पोलीस दलाकडे अतिक्रमणधारकांविरुद्ध तक्रारी वाढत आहे. उपेंद्रनगर येथील एका प्रकरणात खुद्द पोलीस यंत्रणेने अतिक्रमण काढण्याची सूचना देऊनही उभय यंत्रणा त्यांना जुमानत नसल्याचे दिसत आहे.
सिडको परिसरातील अतिक्रमणे हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. या भागात रस्त्यालगतच्या बहुतेक घरांचे परस्पर दुकानांमध्ये रुपांतर झाले आहे. इतकेच नव्हे तर, नियम धाब्यावर बसवून घरावर इमले चढविले गेले. त्यामुळे काही ठिकाणी घरातून वीज वाहिन्यांना हात लागेल, अशी स्थिती आहे. यामुळे घडलेल्या दुर्घटनांमुळे काहींना प्राणही गमवावे लागले आहेत. अशा घडामोडी घडत असूनही सिडको प्रशासन आणि महापालिका अनधिकृत बांधकामांच्या प्रश्नावर मुग गिळून बसल्याचे दिसते. सिडकोतील अतिक्रमणांच्या विषयावर या यंत्रणांच्या टोलवाटोलवीमुळे हा विषय पोलीस यंत्रणेसाठी तापदायक ठरला आहे. मुळात, राजकीय दबावामुळे महापालिका वा सिडको प्रशासन परिसरातील अतिक्रमणे काढण्यास उत्सुक नसते. त्यामुळे सर्वसामान्यांना नाहक मनस्ताप सोसावा लागत आहे. सिडकोतील उपेंद्रनगर, पवननगर, त्रिमूर्ती चौक, राणेनगर आदी भागात सिडकोने निवासी संकुल उभारलेली आहेत.
या संकुलात तळ मजल्यावर वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांनी थेट रस्त्यांपर्यंत घराच्या भिंती वाढविल्या. त्यामागे या जागेचा व्यापारी तत्वावर लाभ घेण्याचा उद्देश स्पष्ट लक्षात येतो. त्यामुळे या जागेचा वापर व्यायामशाळा, छोटी कटलरी दुकाने, शिवण कामाचे व्यवसाय, लॉटरी सेंटर, दूध विक्री केंद्र, राजकीय पक्षांची संपर्क कार्यालये आदींसाठी केला जातो. या माध्यमातून घरमालकांना अर्थाजर्नाचा मार्ग सापडला असला तरी स्थानिकांना दररोज अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
उपेंद्रनगर भागातील सिडकोच्या सहाव्या योजनेत एचआयजी ३ इमारतीच्या तळमजल्यावर बुधाजी चव्हाण यांनी तळमजल्यावर अनधिकृतपणे चार टपऱ्या उभारल्या. या ठिकाणी सुरू झालेल्या अनधिकृत व्यवसायामुळे टवाळखोरांचा उपद्रव वाढला. इमारतीतील महिला वर्गास घराबाहेर पडणे अवघड झाले. स्थानिकांशी वाद घालून अतिक्रमण करणाऱ्या बुधाजी चव्हाण व त्यांचा मुलगा संदीप यांनी महिलांशी अरेरावीची भाषा केली. या प्रकरणी पिता-पुत्रांविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अशा अतिक्रमणांमुळे कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होत असल्याने अशी अतिक्रमणे त्वरित हटविण्याची गरज व्यक्त केली. त्यासाठी आवश्यक ते पोलीस बळ उपलब्ध करण्याची तयारी दर्शविली गेली.
संशयितांना अटक झाल्यानंतर ४८ तासाच्या आत अतिक्रमण काढण्याचा इशारा पोलीस यंत्रणेने दिला होता. परंतु, सहा ते सात दिवसांचा कालावधी उलटूनही सिडको व महानगरपालिका ढिम्म आहे. परिणामी, परिस्थितीत कोणताही बदल होऊ शकला नाही. उदाहरणादाखल म्हणून प्रकरणाकडे पाहता येईल.
सिडकोतील बहुतांश भाग याच पध्दतीने अतिक्रमणांच्या विळख्यात गुरफटला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वी धडक अतिक्रमण मोहिम राबविण्याचे निर्देश दिले होते. इतर भागातील किरकोळ अतिक्रमणे हटवून पालिका वेळ मारुन नेत असली तरी नवीन नाशिककडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. ही बाब सर्वसामान्यांबरोबर पोलीस यंत्रणेसाठी डोकेदुखी ठरल्याचे अधोरेखीत होत आहे.