सिडकोच्या वतीने खारघर सेक्टर ३६ येथे बांधण्यात येणाऱ्या एक हजार २४४ घरांची माहिती पुस्तिका व अर्ज विक्रीचा गुरुवारी बेलापूर येथे करण्यात आलेला कार्यक्रम सिडकोने घरांच्या चाव्या देत असल्याच्या आविर्भावात केला. त्यासाठी हजारो रुपये खर्च करुन सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी आपली व्यासपीठावर मिरवण्याची हौस भागवून घेतली. या संकुलातील घरांचा ताबा देईपर्यंत सिडकोत अध्यक्ष म्हणून राहण्याची खात्री नसल्याने अध्यक्षांनी ही दुधाची तहान ताकावर भागवून घेतल्याची चर्चा सिडको वर्तुळात सुरू आहे. विशेष म्हणजे अध्यक्षांनी अर्ज वितरण करण्याचे फोटो काढेपर्यंत या योजनेचे विविध शाखांवर सुमारे २०० अर्ज विकले गेले होते.
सिडकोने खारघर येथील पारसिक हिलच्या पायथ्याशी व्हॅली शिल्प नावाने एक गृहनिर्माण योजना आणली आहे. उच्च आणि मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांसाठी असणाऱ्या या योजनेतील एक हजार २४४ घरे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची आहे. या गृहसंकुलातील एक घर कमीत कमी ६० लाखांपर्यंतचे, तर जास्तीत जास्त एक कोटी रुपये किंमतीचे आहे. वाहतुकीची सध्या कोणतीही सुविधा नसल्याने आणि खांदेश्वर रेल्वे स्थानक सात किलोमीटर लांब असल्याने ज्यांच्या घरासमोर गाडय़ांची रांग आहे, ते ग्राहक ही घरे घेतील असे दिसून येते. सिडकोने या संकुलात अनेक अत्याधुनिक आणि अद्ययावत सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात तरणतलावापासून ते क्लब हाऊसपर्यंतच्या सर्व सुविधा आहेत. त्यामुळे सिडकोने या घरांचा दर आजूबाजूच्या खासगी बिल्डरांएवढाच लावला आहे. या घरांची अर्ज विक्री गुरुवारपासून करण्यात आली. सिडकोने आतापर्यंत घरकुल, सेलिब्रेशन, वास्तुविहार, स्पॅगेटी, घरोंदा, उन्नतीसारखे अनेक प्रकल्प राबविले, पण घरनोंदणी अर्जाची एवढय़ा धूमधडाक्यात विक्री सुरू झाल्याची नोंद सिडकोच्या इतिहासात नाही. श्रीमंतांसाठी ही घरे असल्याने या पायघडय़ा घातल्याची चर्चा आहे. या व्हॅली शिल्पातील घराच्या अर्ज विक्रीसाठी गुरुवारी सिडकोच्या बेलापूर येथील दुसऱ्या कार्यालयासमोर रीतसर शामियाना उभारण्यात आला होता. त्यासाठी हजारो रुपये खर्च करण्यात आले. सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, संचालक नामदेव भगत, मुख्य अभियंता के.के. वरखेडकर, मुख्य नियोजनकार एम.डी. लेले, पणन व्यवस्थापक विवेक मराठे हे उच्च अधिकारी उपस्थित होते. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक, संजय भाटिया आणि सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांनी अशा ‘शायनिंग चेअरमन’ कार्यक्रमाकडे पाठच फिरवल्याचे दिसून आले. हा अर्ज विक्री कार्यक्रम अकराच्या सुमारास सुरू झाला. त्याअगोदर या व्हॅली शिल्प योजनेच्या अर्जाची विक्री सिडकोच्या तीन कार्यालये व टीजेएसबीच्या ७० शाखांमध्ये सकाळी साडेनऊपासून सुरू झाली होती. त्यामुळे हिंदुराव यांनी माहिती पुस्तिका व अर्ज प्रदान करण्याच्या छबी कॅमेरात टिपण्यापर्यंत दोनशे अर्जाचे वितरण झाले होते. साध्या अर्ज विक्रीचा हा कार्यक्रम इतक्या धूमधडाक्यात करण्याची गरज काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
*या कार्यक्रमाला संचालक नामदेव भगत यांनी सिडकोला घरचा आहेर दिला. ग्राहकांकडून पाच आणि दहा लाखांच्या डीडी घेऊन सिडको ते पैसे वापरणार हे योग्य आहे का, असे मत भगत यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर अर्जाची किंमत ५०० रुपये ठेवण्याची गरज काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. कर्ज घेण्यासाठी विशिष्ट बँकांचा आग्रह का, अशी प्रश्नांची फटकेबाजी करत भगत यांनी हिंदुराव यांच्या या कार्यक्रमात करून ग्राहकांच्या मनातील भावना व्यक्त केल्या.
*जागतिक आर्थिक मंदी आणि महागाईचे पडसाद या गृहनिर्माण योजनेवर उमटण्याची चिन्हे आहेत. ही घरे महाग असल्याने पहिल्या दिवशी केवळ १५ अर्ज विकले गेले. ही संख्या दिवसेंदिवस कमी होईल, सिडकोच्या इतर योजनांवर ग्राहकांच्या उडय़ा पडल्याचा अनुभव आहे. त्यासाठी रात्रभर जागून रांगेत उभे राहणारे ग्राहक होते. या योजनेतील दहा हजार अर्जाची विक्री होईल, असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. सिडकोची ही योजना प्रति एनआरआय योजनेसारखी असल्याने येथे घर घेणाऱ्या ग्राहकांची आयकर भरण्याची क्षमतादेखील तपासली जाण्याची शक्यता आहे.