खारघर येथील सिडकोच्या स्वप्नपूर्ती गृहसंकुलातील घरांची सोडत काढण्यासाठी उपस्थित राहणाऱ्या २८० ग्राहकांचीही मंगळवारी सोडत काढून सिडकोने पारदर्शक कारभाराचा आदर्श घालून दिला. त्यामुळे ८६ हजार ग्राहकांपैकी शनिवारी उपस्थित राहणारे २८० ग्राहकांपैकी किती जणांचे घरांचे स्वप्न पूर्ण होते की ते केवळ सोडतीसाठी उपस्थित राहणारे भाग्यवंत ठरतात ते कळणार आहे.
सिडकोने खारघर सेक्टर- ३६ येथे ३ हजार १५४ घरांचे गृहसंकुल उभारण्यास सुरुवात केली असून त्याची सोडत शनिवारी बेलापूर येथील सिडको मुख्यालयात होणार आहे. ८६ हजार ग्राहकांचा कुंभमेळा नवी मुंबईत आयोजित करणे शक्य नसल्याने सिडकोने ही सोडत प्रातिनिधिक स्वरूपात घेऊन त्याचे लाइव्ह वेबकास्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.
आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांसाठी ७०४ घरे असून त्यासाठी ४८ हजार ११९ अर्ज आले आहेत. त्याची सोडत सकाळच्या सत्रात काढण्यात येणार असून दुपारच्या सत्रात अल्प उत्पन्न गटातली दोन हजार ४५० घरांसाठी सोडत निघणार आहे. त्यासाठी ३८ हजार ७३६ अर्ज आले आहेत.
या सोडतीसाठी लागणारी प्रत्येक आरक्षणातील वीस ग्राहकांना या ठिकाणी प्रवेशिका दिल्या जाणार असून दोन प्रकारांतील घरांसाठी एकूण ४८० ग्राहक उपस्थित राहणार आहेत. त्यापैकी काही जणांना घरे मिळणार असून त्यांचा आनंद गगनात मावणार नाही, असे चित्र असणार आहे तर काही जण केवळ सोडतीचे भाग्यवंत ठरणार आहेत. ४८० सोडत उपस्थित भाग्यवंतांची सोडत मंगळवारी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया, नवीन शहर प्रशासक सुनील केंद्रेकर, मुख्य दक्षता अधिकारी डॉ. प्रज्ञा सरवदे, पत्रकार विनायक पात्रुडकर, आरटीआय कार्यकर्ते संदीप ठाकूर, मागासवर्गीय कक्ष अधिकारी कल्पना जगताप भोसले यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. शनिवारी भाग्यवंत ठरणाऱ्या ग्राहकांना तीन दिवसांत त्यांना कळविण्यात येणार असून ही सोडत डब्लूडब्लूडब्लू. सिडको. महाराष्ट्रा.जीओव्ही. इन या वेबसाइटवर लाइव्ह पाहण्यास मिळणार आहे.

खातरजमा न करता वेबसाइटवर माहिती
स्वप्नपूर्तीची सोडत पारदर्शक व्हावी यासाठी सिडकोने पूर्ण खबरदारी घेतलेली असताना या पारदर्शकतेचा कसा अतिरेक करण्यात आला आहे ते उघडकीस आले आहे. काही दिवसांपूर्वी टीजेएसबी व अ‍ॅक्सेस बँकांनी सर्व अर्जदारांची सर्व माहिती सिडकोकडे दिली. ही माहिती सिडकोच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या अतिउत्साही कर्मचाऱ्यांनी कोणतीही खातरजमा न करता सिडकोच्या वेबसाइटवर टाकली. त्यामुळे ८६ हजार ग्राहकांनी अर्जात दिलेले पॅन कार्ड क्रमांक, बँकेचे कोड क्रमांक जगजाहीर झाले आहेत. ह्य़ा माहितीचा उपयोग संगणक हॅकर करणाऱ्यांनी केल्यास त्याचा दोष कोणाला द्यायचा, असा प्रश्न उपस्थित राहिला आहे. सिडकोच्या आयटी विभागात स्थापत्यशास्त्रातील अभियंते भरल्याने हा गोंधळ झाल्याचे समजते.