सिडको वसाहतींमधील रहिवाशांच्या वैद्यकीय सेवेची जबाबदारी घेणाऱ्या सिडकोने दवाखान्यामधील ओपीडीची वेळ वाढविण्याची मागणी सिडको वसाहतीमधील नागरिकांकडून होत आहे. या दवाखान्यांमध्ये किमान चार खाटांची तात्पुरती सोय करावी अशी मागणी रुग्णांकडून होत आहे.
वसाहतींची निर्मिती केल्यानंतर मागील दीड वर्षांपासून रहिवाशांना वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या सिडको प्रशासनाच्या नवीन पनवेल, खारघर, कळंबोली व उलवा येथील सिडकोचे दवाखाने रुग्णांसाठी आधार बनले आहेत. येथे पाच रुपयांमध्ये उपचार केला जातो. या दवाखान्यांमध्ये केस पेपर काढण्यासाठी नातेवाईकांना रांगा लावून रुग्ण उपचार घेतात. त्यामुळेच या चारही दवाखान्यांमध्ये दिवसाला १५० हून अधिक रुग्णांची सरासरी हजेरी लागते. दवाखाने सुरू झाल्यापासून सुमारे पाच हजार रुग्णांना या दवाखान्याचा फायदा मिळाला आहे. येथे एक एमबीबीएस डॉक्टर, आरोग्य तांत्रिक सेवक, आरोग्य सेवक असा मोजका कर्मचारीवर्ग ही वैद्यकीय सेवा पुरवितात. परंतु ही सेवा सकाळी ९ ते दुपारी एक वाजेपर्यंत असते. गरीब व गरजू रुग्ण खासगी दवाखान्यात जास्त रोकडा उपचार घेण्याऐवजी या दवाखान्यांवर अवलंबून आहेत. या दवाखान्यांमुळे वसाहतीमधील खासगी दवाखान्यांमध्ये गरीब रुग्णांचे जाणे कमी झाले. मात्र सिडकोच्या दवाखान्यात ओपीडी सेवा रात्री आठ वाजेपर्यंत व जागेचे नियोजन करून शक्य झाल्यास चार खाटांची सोय केल्यास रुग्णांना दाखल करण्याची येथे सोय करता येईल अशी मागणी सामान्यांकडून होत आहे.
सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया यांनी प्रस्तावित सुपर स्पेशालिटी रुग्णालये पनवेलमध्ये उभे राहतील व ही रुग्णालये सुरू झाल्यावर त्यामधील आरक्षित खाटांवर अत्यल्प गटाला उपचार मिळतील तोपर्यंत न थांबता या गरीबवर्गासाठी सुरू केलेल्या सद्यस्थितीमधील दवाखान्याची ओपीडी वेळ वाढवावी व किमान खाटांची सोय करावी अशी अपेक्षा रहिवाशांची आहे.