सिडकोने नवी मुंबई पालिकेच्या रुग्णालय उभारणीला वाशी सेक्टर दहा येथील भूखंड दिला होता. पालिकेने तो हिरानंदानी फोर्टिज रुग्णालय व्यवस्थापनाला भाडेतत्त्वावर देण्यापूर्वी सिडकोची परवानगी का घेण्यात आली नाही. त्यामुळे पालिकेने मूळ करारनाम्याचा भंग केला आहे. त्यामुळे हा भूखंड का काढून घेण्यात येऊ नये अशा आशयाची नोटीस सिडको प्रशासनाने पालिकेला दिली आहे. त्यामुळे वाशी येथील पालिकेचे रुग्णालय आणि त्यातील दोन लाख चौरस फूट हिरानंदानी फोर्टिजला देण्यात आलेली जागा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

नवी मुंबई पालिकेच्या मागणीनुसार शासनाच्या माध्यमातून सिडकोने सप्टेंबर १९९७ रोजी संर्दभ रुग्णालय उभारणीसाठी सुमारे पाच एकरचा भूखंड पालिकेला दिला आहे. पालिकेने या रुग्णालयातील अर्धा जागेवर प्रथम संर्दभ रुग्णालय बांधले. त्यानंतर शिल्लक जागा पहिल्यांदा हिरानंदानी हॉस्पिटल यांना भाडेतत्त्वावर दिली आहे. शहरात पंचतारांकित रुग्णालय निर्माण व्हावे हा त्यामागचा उद्देश होता. पण हा मूळ उद्देशाला हरताळ फासण्यात आला असून हिरानंदानी यांनी फोर्टिज रुग्णालयाबरोबर सामंजस्य करार करून त्यांना ही विस्र्तीण जागा देऊन टाकली आहे. गरीब गरजू रुग्णांना सवलतीच्या दरात उपचार अशी अपेक्षा होती, पण फोर्टिजने गेली दहा वर्षांत याबाबत उदासीन भूमिका घेतली. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते संदीप ठाकूर यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात या याचिकेवर सुनावणी होणार आहे. पालिकेने सिडकोला विश्वासात न घेता त्या भूखंडावर बांधण्यात आलेल्या इमारतीचा भाग हिरानंदानी व फोर्टिज हॉस्पिटला दिल्याने मूळ करारनामाचा पालिकेने भंग केला आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाने ही नोटीस पालिकेला देण्यात आली असून, पालिका प्रशासन यावर काय प्रतिज्ञापत्र सादर करते यावर या भूखंडाचे भवितव्य ठरणार आहे. जमिनी खरेदी-विक्री हा पालिकेचा व्यवसाय नसताना अशाच प्रकारे पालिकेने मुख्यालय बांधण्याच्या नावाखाली वाशी सेक्टर १९ येथील सिडकोने बांधलेल्या इमारती विकत घेऊन नंतर त्या इमारतींचा भूखंड विकल्याचे प्रकरण आहे, मात्र या प्रकरणाबाबत चिडीचूप आहे.