सिडकोच्या वतीने खारघर सेक्टर ३६ येथे बांधण्यात येत असलेल्या तीन हजार १५४ घरांची सोडत शनिवारी सकाळी ११ वाजल्यापासून सिडकोच्या बेलापूर येथील मुख्यालयाच्या सभागृहात काढण्यास सुरुवात होणार असून यासाठी राज्यातून ८६ हजार ८५५ अर्ज आले आहेत. यातील ३१५४ नागरिक भाग्यवंत ठरणार आहेत. त्याचे थेट प्रक्षेपण सिडकोच्या वेबसाइटवर होणार असून दुपारी पहिल्या सोडतीतील भाग्यवंतांची यादी सिडकोत तात्काळ उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी केवळ दोन उत्पन्न गटातील प्रत्येकी २४० ग्राहकांना आमंत्रित करण्यात आले असून त्यांना कुरियअरद्वारे प्रवेशिका पाठविण्यात आलेल्या आहेत. सोडतीची उत्कंठा लक्षात घेऊन आमंत्रणाशिवाय येणाऱ्या ग्राहकांची संख्या पाहता पोलीस बंदोबस्तदेखील मागविण्यात आला आहे.
व्हॅलीशिल्प गृहसंकुलाच्या सोडतीनंतर सिडकोने आर्थिकदृष्टया दुर्बळ आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी खारघर येथे स्वप्नपूर्ती नावाचे गृहसंकुल बांधण्यास हाती घेतले आहे. त्यातील तीन हजार १५४ घरांची सोडत शनिवारी निघणार असून त्यासाठी ८६ हजार ८५५ अर्ज आले आहेत. या सर्वाचा सोडतीत समावेश करण्यात आला आहे. पण त्यांना एकाच ठिकाणी आमंत्रित करणे शक्य नसल्याने सिडकोने वेबसाइट प्रक्षेपणाचा निर्णय घेतला आहे. या सर्व अर्जदारांपैकी ११ आरक्षण व एक खुल्या प्र्वगातील ग्राहकांची सोडतीला सकाळी ११ वाजल्यापासून प्रारंभ होणार असून त्यातील २४० ग्राहक उपस्थित राहणार असल्याचे सिडकोचे जनसंपर्क अधिकारी डॉ. मोहन निनावे यांनी सांगितले. ग्राहकांची ही सोडत संपल्यानंतर प्रतीक्षा यादीतील दीड हजार ग्राहकांचीदेखील सोडत काढली जाणार आहे. कागदपत्रांची किंवा शुल्काचा वेळीच भरणा न करणाऱ्या भाग्यवंताचे घर रद्द झाल्यास त्याजागी या प्रतीक्षा यादीतील ग्राहकांचा क्रमांक लागणार आहे. सोडत अशा प्रकारे वेबसाइटवर थेट प्रक्षेपण करण्याचा शासकीय संस्थांमधील सिडकोने केलेला हा पहिलाच प्रयत्न असून ग्राहकाने आपला अर्ज क्रमांक सिडकोच्या साइटवर टाकल्यास त्याला त्याचे घर सोडतीत लागले आहे की नाही ते घरबसल्या कळणार आहे. यासाठी माजी न्यायाधीश एस. डी. धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांची एक पर्यवेक्षण समिती नेमण्यात आली असून सोडत झाल्यानंतर या समितीच्या सह्य़ा सोडतीच्या कागदपत्रांवर घेतल्या जाणार आहेत. सोडतीसाठी सिडकोने विशेष संगणक प्रणाली विकसित केली असून तिची वैधता केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून घेण्यात आली आहे. सोडतीत अर्जदाराचे नाव अर्ज क्रमांकाची सरमिसळ केली जाणार असून ही सरमिसळ ९९९९ आकडय़ांमध्ये करता येण्यासारखी आहे. ०००१ ते ९९९९ यापैकी कोणत्याही चार अंकी संख्येचा सीड नंबर घेऊन रॅन्डीझम पद्धतीने सोडत काढली जाणार आहे. संध्याकाळपर्यंत दोन्ही उत्पन्न गटातील ग्राहकांच्या सोडती पूर्ण होणार असून त्यांची माहिती सिडकोत उपलब्ध करून दिली जाणार आहे.

स्वप्नपूर्तीची सोडत काढण्याच्या दृष्टीने सिडकोने सर्व तयारी केली असून पहिल्या टप्यात आर्थिक दुर्बल व दुसऱ्या टप्यात अल्प उत्पन्न गटातील सोडत निघणार असून त्याची माहिती तात्काळ उपलब्ध करून दिली जाणार आहे. याशिवाय वेबसाइट हा पर्याय पूर्णवेळ खुला आहे. भाग्यवंत ग्राहकांना वीस डिसेंबपर्यंत इरादापत्रे पाठविली जाणार आहेत. भाग्यवान न ठरलेल्या अर्जदारांचे नोंदणीशुल्क १० डिसेंबरपासून टीजेएसबी व अ‍ॅक्सेस बँकेमार्फत परत करण्यात येईल.
– विवेक मराठे,
पणन व्यवस्थापक, सिडको.