महापालिकेतील अनागोंदी कारभारामुळे स्थानिक नगरसेवक, आमदार जनतेचे प्रश्न मांडताना दिसत नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नाना महाले यांनी केला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सिडकोतील पवननगर परिसरातील लोकमान्य नगरात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
याप्रसंगी शेफाली भुजबळ यांनी घरकुल, रस्त्यावरील खड्डे, शहर विकास आराखडा, पाणी, घंटागाडी अशा विविध विषयांवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आंदोलन केल्याचा मुद्दा मांडताना रोडरोमियोंना जरब बसविण्याचे कामही करण्यात आल्याचे नमूद केले. सुनील बागूल यांनी तरुणांनी एकत्र येऊन अन्यायाच्या विरोधात संघर्ष करण्याचे आवाहन केले. महाले यांनी आमदार व स्थानिक नगरसेवक जनतेचे प्रश्न मांडत नसल्याने आपणच आपले प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे नमूद केले. कविता कर्डक यांनी नवनिर्माणाच्या नावाखाली नाशिकच्या जनतेची दिशाभूल करण्याचे काम काही पक्ष करीत असल्याचा आरोप केला. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार यांनी आपलीच काही नतदृष्ट मंडळी जातीपातीच्या नावाखाली समाजाची दिशाभूल करण्याचे काम करीत असल्याचा आरोप केला.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष छबू नागरे यांनी तरुणांना धर्म, पंथ, प्रांत यामध्ये अडकवून बरबाद करू पाहणाऱ्या जातीयवादी पक्षांना धडा शिकविला पाहिजे असे सांगितले. प्रास्ताविक   शरद    लबडे  यांनी केले. सूत्रसंचालन सचिन चौगुले यांनी केले. आभार प्रतीक सोनवणे यांनी मानले.