प्रश्न-  दोन दिवसांपूर्वी शाळेच्या आवाराबाहेर एका नववीच्या विद्यार्थ्यांवर चाकुचा हल्ला झाला. त्याबद्दल..
उत्तर-  तो हल्ला शाळेच्या आवाराबाहेर झाला. त्याचा शाळेशी काय संबंध?
प्रश्न- काही दिवसांपूर्वी शाळेबाहेरील आवारातून मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न झाला. त्याबद्दल काही?
उत्तर- ते त्या मुलीलाच माहिती नेमकं काय झाले ते..
ही बेधडक उत्तरे आहेत नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या सिडको येथील पेठे विद्यालयातील शिक्षकांची. गेल्या काही दिवसात शाळेच्या आवाराबाहेर असे काही प्रसंग घडलेत की त्यातून संस्था तसेच शाळेने खबरदारी घेण्याची वेळ आली आहे. असे असतानाही प्रसंगाचे गांभीर्य लक्षात न घेता शाळेच्या व्यवस्थापनाकडून दुर्लक्ष केले जात आहे.
कामगार वस्ती असलेल्या सिडको परिसरात भाजी बाजाराजवळ नाशिक एज्युकेशन सोसायटीचे पेठे विद्यालय आहे. पूर्व प्राथमिक, प्राथमिक तसेच माध्यमिक असे मिळून येथे साधारणत: साडेपाच हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संस्थेने प्राथमिक व माध्यमिक विभागांचा एकमेकांशी संबंध येणार नाही यादृष्टिने रस्त्याच्या दुतर्फा दोन स्वतंत्र विभागात दोन सत्रात शाळा सुरू ठेवली आहे. शाळेची विद्यार्थी बस वाहतूक सेंवा नाही. त्यामुळे विद्यार्थी व्हॅन, रिक्षा, सायकलने येतात. विशेष म्हणजे वापर होत नसल्याने संस्थेच्या बसेस या विद्यालयाच्या मैदानात धूळ खात पडल्या आहेत. प्राथमिक विभागाच्या आवारात मुख्य प्रवेशद्वारासह तीन प्रवेशद्वार आहेत. मात्र विद्यार्थ्यांची ये-जा केवळ मुख्य प्रवेशद्वाराने होते. सकाळ सत्रात मराठी माध्यमचे पूर्व प्राथमिक व प्राथमिकचे वर्ग, दुपार सत्रात इंग्रजी माध्यमचे पूर्व प्राथमिक व प्राथमिकचे वर्ग सुरू असतात. दोन्ही माध्यमांचे मिळून दोन ते अडीच हजार विद्यार्थी शाळा भरताना व सुटताना मुख्य प्रवेशद्वाराने ये-जा करतात. प्रवेशव्दाराजवळ विद्यार्थ्यांना नेण्यासाठी आलेले पालक, त्यांची वाहने, व्हॅन, रिक्षा यांची गर्दी असते. त्याच वेळी माध्यमिकचे वर्ग भरतात. तसेच पहिल्या सत्रातील शाळा सुटते. या सर्व गर्दीत विद्यार्थी आपल्या पालकांना, रिक्षावाल्या काकांना शोधण्यासाठी थेट रस्त्यावर येतात. नेमकी यावेळी रस्त्यावरील नेहमीची वाहतूकही सुरू झालेली असल्याने गाडय़ांच्या गर्दीतून मुलांना वाट काढावी लागते. पालकांनी, वाहन चालकांनी शाळेने दुसरे प्रवेशद्वार खोलण्याची मागणी केली आहे. त्यामुळे वाहने थेट शाळेच्या आवारात जाऊ शकतील. व्हॅन वा रिक्षातील मुले थेट आपल्या वाहनात बसू शकतील. मात्र प्राथमिक विभागाकडून पालकांच्या या मागणीची दखल घेतली गेलेली नाही. त्यासाठी प्रवेशद्वाराच्या दुरूस्तीचे काम सुरू असल्याचे कारण देण्यात आले आहे. प्राथमिक विभागाच्या आवारात गवत वाढले असून कचऱ्याचे साम्राज्य आहे. त्याचा विद्यार्थ्यांना त्रास होऊ शकतो.
काही दिवसांपूर्वी माध्यमिक विद्यालयातील एका विद्यार्थिनीच्या अपहरणाचा प्रयत्न झाला. या प्रकरणाने जाग आलेल्या शालेय व्यवस्थापनाने मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षकाची नेमणूक केली. तसेच प्रवेशद्वारावर अनोळख्या व्यक्ती, पालक यांची नोंद करण्यासाठी नोंदवही ठेवण्यात आली. मात्र सुरक्षारक्षक शाळा भरतांना व सुटतांना मुलांना हटकण्यात मग्न असतो. त्यांच्याकडून अनोळख्या व्यक्तीला कुठलीही विचारणा न झाल्याने शाळेच्या आवारात थेट प्रवेश होतो. शाळेत दोन्ही विभाग मिळून तीन अग्निशमन नळकांडय़ा आहेत. शाळेत सीसी टीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासंदर्भात संस्था पातळीवर निर्णय विचाराधीन आहे.  शाळेच्या बाजूला भाजी बाजार असल्याने भाजीवाल्यांचे शाळेच्या रस्त्यावर होणारे अतिक्रमण हा देखील व्यवस्थापनासाठी डोके दुखीचा विषय आहे. शाळेला असलेली संरक्षण भिंत कमी उंचीची असल्याने बाहेरील व्यक्तीला त्यावरील तारा वाकवून सहज  प्रवेश करता येतो. याचा फायदा घेत टारगटांकडून शाळा भरताना व सुटतांना मुलींना त्रास देणे तसेच काही मुलांना दमदाटी करणे हे नित्याचे झाले आहे. या आठवडय़ात सकाळ सत्रातील शाळा सुटल्यानंतर नववीच्या विद्यार्थ्यांचे एकमेकांतील वादाचे पर्यावसन चाकु हल्ल्यात झाले. याबाबत हा प्रकार शाळेच्या बाहेर घडला असून शाळेशी त्याचा काही संबंध नसल्याचे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. मुळात शाळकरी मुलाकडे चाकु येतोच कसा, हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. दुसरीकडे शाळेत मोबाईल आणण्यास बंदी असतांनाही विद्यार्थ्यांकडे सर्रासपणे ते दिसून आले.
हे रोखण्यासाठी व्यवस्थापनाने काही कठोर उपाय आखण्याची गरज आहे. पोलिसांनी बीट मार्शलच्या माध्यमातून या परिसरात गस्त वाढविली आहे. रोडरोमिअंोंवर चाप बसविण्याचा व गर्दीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न होत
असले तरी ते कायमस्वरूपी असावेत हीच पालकांची
अपेक्षा आहे.
मुले बेपत्ता होणे, विद्यार्थिनीच्या अपहरणाचा प्रयत्न असे प्रकार गेल्या काही दिवसांत घडत असल्याने पोलीस यंत्रणेने शालेय व्यवस्थापनास विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टिने दक्ष राहण्याची सूचना केली आहे. या घटनांमुळे पालक वर्गात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील शाळांमध्ये विद्यार्थी सुरक्षिततेची स्थिती नेमकी काय आहे, याचा
घेतलेला हा वेध.