News Flash

परिवहन सेवेच्या अभावामुळे सिडकोवासीयांचे हाल

सिडको वसाहतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांसाठी जवळील रेल्वेस्थानकांमध्ये येण्यासाठी परिवहन सेवेची आवश्यकता आहे.

| February 14, 2014 07:38 am

सिडको वसाहतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांसाठी जवळील रेल्वेस्थानकांमध्ये येण्यासाठी परिवहन सेवेची आवश्यकता आहे. विशेषत: नवीन पनवेल ते पनवेल रेल्वे स्थानक, खांदा कॉलनी ते खांदेश्वर रेल्वे स्थानक आणि कळंबोली (रोडपाली) ते मानसरोवर रेल्वे स्थानक या मार्गावर तातडीने बसफेऱ्या सुरू कराव्यात अशी प्रवाशांची मागणी आहे.
सिडको वसाहतीत बहुसंख्येने असणारा नोकरदारवर्ग रेल्वेने प्रवास करतो. नोकरीसाठी मुंबई गाठणारे हजारो प्रवासी रेल्वे स्थानकांकडे धाव घेतात. या प्रवाशांना सध्या पायपीट अथवा तीन आसनी रिक्षांशिवाय पर्याय नाही. सरकारच्या परिवहन विभागातील अधिकाऱ्यांचा प्रवासी वर्गाकडे कानाडोळा होत असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. नवीन पनवेल, खांदेश्वर आणि मानसरोवर या रेल्वे स्थानकांमध्ये ही बससेवा सुरू होऊ शकली नाही. कामोठे आणि खांदेश्वर येथील स्थानिक तीन आसनी रिक्षाचालकांचा विरोध असल्यामुळे मानसरोवर आणि खांदेश्वर स्थानकांमध्ये बससेवा सुरू होऊ शकली नाही. मात्र नवीन पनवेल परिसरात ही बससेवा सुरू करण्यास कोणाचाही विरोध नव्हता. किमान नवीन पनवेल येथील सुकापूर, डी मार्ट येथील झपाटय़ाने वाढणाऱ्या शहरीकरणाचा  विचार करता येथे सिटीबस असणे गरजेचे आणि संबंधित प्रशासनाला नफ्याचे ठरणार आहे. जुन्या पनवेल शहरातील बावनबंगला येथील प्रवाशांना खांदेश्वर रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी सध्या खांदा कॉलनी सिग्नलपर्यंत शेअर रिक्षा किंवा मिनीडोअर प्रवासासाठी ८ रुपये, त्यानंतर पुन्हा खांदेश्वर सिग्नलकडून खांदेश्वर रेल्वे स्थानक या अर्धा किलोमीटर अंतर पार करण्यासाठी रिक्षाला आठ रुपये मोजावे लागतात. खांदेश्वर शहरातील सिग्नल बाजूकडून हा प्रवास प्रती आसन १० रुपये एवढा पडतो. चार पावलांसाठी दोन रुपये जादा का, असा प्रश्न रिक्षा चालकांना विचारण्यात अर्थ नसतो. कारण स्थानिक रिक्षाचालक खांदेश्वर आणि मानसरोवर रेल्वे स्थानकांच्या परिसरात इतरांना रिक्षा आणूच देत नाहीत.   
इकडे आड तिकडे विहीर..
प्रादेशिक परिवहन विभागाचे नंदकिशोर नाईक म्हणाले की, शहरांचा विकास करणाऱ्या सिडको अथवा पालिका या प्राधिकरणांनी ही बससेवा सुरू करणे अपेक्षित आहे. पनवेल पालिकेला त्यासाठी सरकारी मंजुरी मिळाली आहे. काही वर्षांपूर्वी एनएमएमटीची बस सेवा सुरू झाली होती. स्थानिकांच्या आंदोलनानंतर ती बंद झाली. रिक्षाचालकांनी शेअर भाडे किती आकारावे यासाठी रेल्वे स्थानकांसमोर फलक लावले आहेत. आम्ही रिक्षाचालकांवर कारवाईचे हत्यार उपसले की हे रिक्षाचालक संपावर जातात. पर्यायी दुसरी वाहतुकीची सोय नसल्याने प्रवाशांचे यात हाल होतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2014 7:38 am

Web Title: cidco residents misery
टॅग : Cidco,Panvel
Next Stories
1 नवी मुंबईकरांना पालिकेची व्हॅलेंटाइन गिफ्ट
2 विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या प्रशिक्षण वर्गास तरुणींचा चांगला प्रतिसाद
3 एप्रिलअखेर नवीन खोपटा पूल कार्यान्वित होणार
Just Now!
X