रिक्त झालेल्या जागा न भरता सल्लागार एजन्सी आणि कन्सलटंट यांच्याकडून कामे करून घेण्याचा सिडकोत एक नवीन पायंडा पडला असून, या अधिकाऱ्यांवर सिडको वर्षांला सात कोटी २२ लाख रुपये खर्च करीत असल्याची बाब उघडकीस आली आहे. सल्लागार एजन्सी, कंत्राटी कामगार व कन्सलटंट यांच्याकडून कामे होत असल्याने सिडकोने गेली अनेक वर्षे नोकरभरती केलेली नाही. त्यामुळे सिडकोत १२६५ कामगारांची कमकरता असून सिडकोसाठी दोन हजार ६४० कर्मचारी- अधिकाऱ्यांची शासन मान्यता आहे.
सिडकोत सल्लागार एजन्सी, कन्सलटंट, प्रतिनियुक्ती हा प्रकार अलीकडे वाढीस लागला आहे. त्यामुळे सिडकोने मागील अडीच वर्षांत या संर्वगात १३३ पदे भरली असून त्यांच्यावर सात कोटी २२ लाख रुपये खर्च केला जात आहे. यात पी. सी. सहगल, व्ही. के. कार्ला, ए. भट्टाचार्य, कौशल किशोर, उत्तम माने, सुभाष राणे हे सल्लागार असून एस. सिन्हा, जी. एस. त्रिमुखे, प्रशांत विलुदांडी, अशोक ठोके, प्रफुल्ल जोशी, बाल सुब्रमण्यन, सी. के. पाटील, बी. बी. पवार हे सर्व कन्सलटंट आहेत. इतर ११७ कर्मचारी हे कंत्राटी पद्धतीवर कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांकडून सिडकोच्या विविध विभागातील कामे होत असल्याने सिडको नोकरभरती करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप आहे. प्रतिनियुक्तीवर उच्च अधिकाऱ्यांनी आपल्या मर्जीतील कर्मचाऱ्यांना संधी दिली असून, प्रतिनियुक्ती व कन्सलटंटवर सिडकोचे तीन कोटी ३२ लाख रुपये वर्षांकाठी खर्च होत आहेत, तर विमानतळ, मेट्रोसारख्या प्रकल्पांवर नेमण्यात आलेल्या सल्लागारांसाठी तीन कोटी ५० लाखांची बिदागी दिली जात आहे. यामुळे सिडकोत कंत्राटी, प्रतिनियुक्त कर्मचारी विरुद्ध कायमस्वरूपी असा संघर्ष सुरू झाला आहे. हा मुद्दा घेऊन कामगार संघटना पुढील बुधवारी सिडकोला कोंडीत पकडण्याच्या पवित्र्यात आहे.

सिडकोतील अनेक अनुभवी, निष्णात, तज्ज्ञ कर्मचारी- अधिकारी सध्या सेवानिवृत्त होत असल्याने त्यांची पोकळी निर्माण झाली आहे. प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावरून सिडकोतील नोकरभरती बंद आहे. त्यामुळे ती पोकळी भरून काढण्यासाठी काही कर्मचारी, अधिकारी कंत्राटी तसेच कन्सलटंट म्हणून घेतले जात आहेत. सिडकोचा कामाचा व्याप आजही तसाच आहे. त्यामुळे ही कामे हातावेगळी करण्यासाठी सल्लागार एजन्सी, कन्सलटंट, कंत्राटी कामगार यांचा आधार घेतला जात आहे. ही कोंडी लवकरच संपुष्टात येईल अशी अपेक्षा आहे.
-टी. एल. परब, कार्मिक व्यवस्थापक, सिडको