भारतीय रेल्वे बरोबर ६७ टक्के खर्चाचा आर्थिक भार उचलून नवी मुंबईतील मानखूर्द पनवेल आणि ठाणे तुर्भे रेल्वेचे जाळे विणणाऱ्या सिडकोने आता पनवेल उरण या ३२ किलोमीटरच्या प्रस्तावित रेल्वे मार्गाची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. एक हजार ४१२ कोटी रुपये खर्चाच्या नेरुळ उरण रेल्वे मार्गाचे काम प्रगतिपथावर असून या मार्गात येणाऱ्या दोन खाडीपुलांच्या कामांना वेग आला आहे. पनवेल उरण रेल्वे मार्गाची निर्मिती झाल्यानंतर रायगड तालुक्यातील दोन तालुके रेल्वेने जोडले जाणार आहेत. त्यामुळे नवी मुंबईतील सिडकोचे रेल्वे वर्तुळ पूर्ण होणार आहे. प्रस्तावित विमानतळामुळे या मार्गात काही बदल होण्याची शक्यता आहे.
नवी मुंबईत सिडकोने रेल्वे उभारणीतील खर्चाचा ६७ टक्के भाग उचलल्याने भारतीय रेल्वेने रूळ टाकण्याचा ३३ टक्के खर्च उचलून वीस वर्षांपूर्वी मानखूर्द वाशी रेल्वे सुरू केली. त्यानंतर सहा वर्षांनी हीच रेल्वे पुढे पनवेलपर्यंत नेण्यात आली. त्यानंतर बारा वर्षांपूर्वी ठाणे तुर्भे रेल्वे मार्गाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. मुंबईहून ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांना या रेल्वेच्या वर्तुळामुळे नवी मुंबईचा झपाटय़ाने विकास झाला. त्यामुळे २००१ रोजी तीन लाख लोकसंख्या असणाऱ्या नवी मुंबईची आजची लोकसंख्या वीस लाखांच्या घरात गेली आहे. उरणसारख्या औद्योगिक नगरीला जोडण्यासाठी सिडको एक हजार ४१२ कोटी रुपये खर्च करून पंधरा किलोमीटरचा रेल्वे मार्ग तयार करीत आहे. त्यासाठी बेलापूर खाडीवर अध्र्या किलोमीटर लांबीचा खाडीपूल तयार केला जात आहे. याशिवाय ७० कोटी रुपये खर्च करून दोन वेगळे उड्डाणपूल तयार केले जात आहेत. खारफुटीच्या अडथळ्यामुळे हे काम काही काळ रखडले होते पण सिडकोने या राष्ट्रीय प्रकल्पासाठी विशेष परवानगी आणल्याने काम सध्या प्रगतिपथावर आहे. नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाचा परिसर असलेल्या पनवेल उरण या रायगडमधील दोन तालुक्यांना जोडणाऱ्या ३२ किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गाची उभारणी करण्याचे काम सिडकोने हाती घेण्याचे ठरविले आहे. त्यासाठी लागणारी जमीन सिडकोने राखीव ठेवली आहे. हे काम सध्या प्राथमिक पातळीवर असून नियोजित विमानतळाचा कामांचा टेक ऑफ झाल्यानंतर सिडको या कामाला हात घालणार आहे. विमानतळामुळे रेल्वेच्या नियोजित मार्गात काही ठिकाणी बदल करण्याची गरज पडणार आहे. त्यामुळे आधी विमानतळ नंतर रेल्वे या निर्णयापर्यंत सिडको आली आहे, पण या मार्गाचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आलेला आहे. पनवेल उरणमुळे दोन तालुके जोडले  जाणार असून जेएनपीटी, ओएनजीसी, अनेक वेअर हाउसमध्ये कामाला जाणाऱ्या कामगारांसाठी ही रेल्वे मोठा आधार ठरणार आहे.