विमानतळ प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांसाठी दापोली गावाजवळ विकसित करण्यात येणारे पुष्पकनगर ही वर्ल्ड क्लास सिटी असेल, असा विश्वास सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी व्यक्त केला आहे. विमानतळ प्रकल्पग्रस्तांना प्रस्तावित पुष्पकनगर येथे वाटप करण्यात येणाऱ्या २२.५ टक्के भूखंडाच्या विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. सिडकोचे अध्यक्ष प्रमोद िहदुराव यांच्या हस्ते आज शुभारंभ करण्यात आला. विमानतळ उभारणीसाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. त्याची अंतिम मुदत ३० जुल आहे. त्यानंतर प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरू होईल. साधारण पुढील वर्षांच्या जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत विकासकांची नेमणूक करण्यात येईल, असे भाटिया यांनी या वेळी सांगितले. ही प्रक्रिया सुरू असतानाच समांतररीत्या पुष्पकनगरच्या विकासाचे कामही सुरू असेल. विमानतळामुळे बाधित होणाऱ्या दहा गावांच्या मोजमापाचे आणि वाटपपत्रांचे काम येत्या तीन महिन्यांत पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर पुढील वर्षांच्या सुरुवातीला प्रकल्पग्रस्तांना २२.५ टक्के भूखंडाचा ताबा देण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. याप्रसंगी सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा, संचालक नामदेव भगत, माजी खासदार रामशेठ ठाकूर, उरणचे आमदार विवेक पाटील आदी उपस्थित होते.
पुष्पकनगरच्या विकासासाठी
५६० कोटींचा खर्च
प्रस्तावित पुष्पकनगरच्या विकासासाठी सिडको ५६० कोटींचा खर्च करणार आहे. पहिल्या टप्प्यातील भराव आणि पायाभूत सुविधांच्या कामांसाठी ३२३ कोटींची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी दोन कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली असून पुढील १८ महिन्यांत ही कामे पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.