सिडकोच्या वतीने खारघर सेक्टर ३६ येथे आर्थिकदृष्टय़ा दुर्बळ आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी बांधण्यात येत असलेल्या तीन हजार २९२ घरांच्या स्वप्नपूर्ती गृहसंकुलातील जाहिरात मंगळवारी राज्यातील तीन प्रमुख वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध होत आहे. या घरांची अर्जविक्री जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिवसापासून होणार असल्याचे सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी जाहीर केले होते. पण या संकुलातील लाभार्थीना अर्थपुरवठा करणाऱ्या वित्तसंस्थेबरोबर अद्याप सामंजस्य करार न झाल्याने ही अर्जविक्री एक ऑगस्टपासून सुरू होणार असल्याचे सिडकोच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात त्यांची सोडत निघण्याची शक्यता आहे. या घरांसाठी ५० हजार अर्ज येण्याचा विश्वास सिडकोला आहे.
सिडकोच्या वतीने व्हॅलिशिल्पजवळ सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करणारा स्वप्नपूर्ती हा तीन हजार २९२ घरांचा गृहनिर्माण प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यांची मंगळवारी जाहिरात प्रसिद्ध होत असून या अगोदर जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिवसापासूनच अर्जविक्री होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. पण अर्जाची छपाई आणि वित्तपुरावठा करणाऱ्या संस्थेबरोबर अद्याप सामंजस्य करार न झाल्याने ही अर्जविक्री एक ऑगस्टपासून सुरू होणार असल्याचे सिडकोचे जनसंपर्क अधिकारी डॉ. मोहन निनावे यांनी स्पष्ट केले. सिडको खारघर सेक्टर ३६मध्ये आर्थिकदृष्टय़ा दुर्बळ नागरिकांसाठी ७०४ घरे बांधत असून २८० चौरस फुटांच्या या घरांची किंमत १६ लाखांपर्यंत राहणार आहे. याशिवाय अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी दोन हजार ५९० घरांचे संकुल असून त्या घरांची किंमत २४ लाखांपर्यंत आहे. यासाठी ५० रुपये अर्जाची किंमत असून दुर्बळ घटकासाठी २५ हजारांची अनामत रक्कम तर अल्प उत्पन्न गटासाठी ५० हजार रुपयांची अनामत रक्कम निश्चित करण्यात आली होती. जवळच्या व्हॅलिशिल्पमध्ये हीच रक्कम पाच ते दहा लाख रुपये ठेवण्यात आल्याने संचालक नामदेव भगत यांनी जाहीर टीका केली होती. या घरांसाठी कमीत कमी १६ हजार ते जास्तीत जास्त ४० हजार पगाराची अट असून विविध संवर्गाना आरक्षण ठेवण्यात आले आहे. मार्च २०१६ पर्यंत या घरांचा प्रत्यक्ष ताबा दिला जाणार असून त्यांची सोडत सप्टेंबरमध्ये काढली जाणार आहे. मात्र या महिन्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याने सिडको सोडतीसाठी निवडणूक आयोगाकडून विशेष परवानगी घेणार आहे.