नवी मुंबईतील प्रस्तावित विमानतळ प्रकल्पात जमीन जाणाऱ्या १४ गावांतील प्रकल्पग्रस्तांसाठी गुरुवारपासून सिडको पनवेल सेक्टर १४ येथे विशेष मेट्रो सेंटर सुरू केले जात आहे. या मेट्रो सेंटरमधून विमानतळबाधित साडेतीन हजार प्रकल्पग्रस्तांना दिलासा मिळणार असून या ठिकाणी साडेबावीस टक्के जमिनीचे वितरण १५ ऑगस्टपासून सुरू केले जाणार आहे.  ९८ प्रकल्पग्रस्तांनी जमिनी देण्यास संमतीपत्र दिले आहे. सर्व प्रकल्पग्रस्त जमिनी देतील असा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे.
नवी मुंबई शहर प्रकल्पात ठाणे जिल्ह्य़ातील नवी मुंबई व रायगड जिल्हय़ातील पनवेल, उरण तालुक्यांतील जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. या भागातील ९५ गावांतील ग्रामस्थांना त्यांच्या जमिनीचा मोबदला त्यांच्या तालुका ठिकाणी दिला जात होता. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी प्रकल्पग्रस्तांसाठी २६ कलमी कार्यक्रम घेतला आहे. त्या अंर्तगत प्रकल्पग्रस्तांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा सिडकोचा प्रयत्न आहे. हे सेंटर विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या सेवेसाठी विशेषत: आहे.
त्यामुळे सिडकोने गुरुवारपासून पनवेलमध्ये मेट्रो सेंटर करणार आहे. त्याचे उद्घाटन सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, आमदार विवेक पाटील, प्रशांत ठाकूर, कोकण विभागीय आयुक्त राधेश्याम मोपलवार, रायगडचे जिल्हाधिकारी सुमंत भांगे, उपस्थित राहणार आहेत. या सुविधेमुळे विमानतळ प्रकल्पग्रस्तांना साडेबावीस टक्के योजनेतील भूखंड मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही. त्यामुळे एका हाताने जमिनी देणे आणि एका हाताने साडेबावीस टक्के योजनेतील पुष्पकनगर येथील भूखंड घेणे प्रकल्पग्रस्तांना सोयीचे होणार आहे. सिडकोसाठी नवी मुंबईतील विमानतळ हा एक प्रतिष्ठेचा विषय झाला आहे. त्यामुळे विधानसभा आचारसंहिता लागण्यापूर्वी नवी मुंबई विमानतळाच्या कामाचा टेक ऑफ करण्यासाठी सिडको प्रयत्नशील आहे. त्यासाठी जुलै अखेपर्यंत निविदा काढल्या जाणार असून ऑगस्टपूर्वी विमानतळाची जागतिक निविदा काढण्याचा सिडकोचा प्रयत्न आहे. त्यासाठी या प्रकल्पाला अडसर ठरू पाहणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना सर्व बाजूंनी खूष ठेवण्याच्या दृष्टीने सिडकोने पनवेलमध्ये विशेष मेट्रो सेंटर सुरू केले आहे. एखाद्या शासकीय कंपनीने मेट्रो सेंटर सुरू करण्याची राज्यातील ही बहुधा पहिलीच वेळ आहे.