महावितरणच्या दुर्लक्षामुळे उरणमधील विजेच्या समस्या दिवसेंदिवस वाढू लागल्या असून त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. या विरोधात काँग्रेसने महावितरण कंपनीच्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला होता. याची दखल घेत महावितरण कंपनीने येत्या तीन महिन्यांच्या कालावधीत उरणमधील नागरिकांना सतावणाऱ्या विजेच्या समस्या दूर करण्याचे लेखी आश्वासन मंगळवारी झालेल्या बैठकीत दिले आहे.
उरण तालुक्यातील सडलेल्या विद्युत तारा व विजेचे खांब बदलण्यात येणार असून तशी मागणी पनवेल कार्यालयाकडे करण्यात आलेली आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच पावसाळ्यात विजेच्या तारांवर पडणारी झाडे, फांद्या पडल्याने होणारे अपघात टाळण्यासाठी झाडे व फांद्या तोडण्याचे काम येत्या ३१ मेपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
कंत्राटदारांमुळे रखडलेली कामे येत्या तीन महिन्यांत करण्याचे व गावागावांतील धोकादायक ट्रान्सफार्मरही बदलण्यात येणार आहेत.