नवी मुंबईतील नेचर पार्क म्हणून ओळख असलेल्या सीबीडी पारसिक हिल परिसरात अनधिकृतपणे प्रार्थनास्थळांवर कारवाई करण्याचे आदेश सिडको उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी दिले आहेत.

सीबीडी पारसिक हिल परिसरात अनधिकृत प्रार्थनास्थळांच्या अतिक्रमणात वाढ होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर त्याचा आढावा घेण्यासाठी सोमवारी सिडको व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी पाहणी दौरा केला. या वेळी २७ अनधिकृत प्रार्थनास्थळांचे अतिक्रमण आढळून आले. या सर्व अतिक्रमणांना यापूर्वीच कायदेशीर नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नोटिसीनुसार खुलासा व इतर तपशील सादर करण्याचा अवधीही संपुष्टात आला आहे. त्यामुळे ही अतिक्रमणे अनधिकृत असून यांवर त्वरित एफआयआर दाखल करून निष्कासनाची कारवाई करण्याचे आदेश अधिकाऱ्याना संजय भाटिया यांने दिले.
खारघर येथील उच्च विद्युत दाबाच्या वाहिन्याखालीही अतिक्रमणे करण्यात आली असल्याचे या वेळी निदर्शनास आले. तीही निष्कासीत करण्याचे आदेश अतिक्रमण अधिकारी यांना दिले आहेत. राज्य शासनाच्या धोरणानुसार २००९ पूर्वी बांधण्यात आलेल्या प्रार्थनास्थळे किवा तत्सम अतिक्रमणांना नियमांनुसार नियमित करण्याची तरतूद आहे. पंरतु या पाहणी दौऱ्यात सर्व अतिक्रमणे २००९ नंतरची असल्यामुळे कायदेशीर बाबी तपासून तातडीने ती काढण्यात येण्याच्या सूचना करण्यात आल्या असल्याचे अतिक्रमण विरोधी पथकाचे अधिकारी अनिल पाटील यांना सांगितले.