नवी मुंबईतील नोडल क्षेत्रात गेल्या वर्षभरात उभ्या राहिलेल्या अनधिकृत इमारती व बांधकामांवर सिडको कारवाई करणार असून या कारवाईला राजकीय नेत्यांचा विरोध आहे. हा विरोध होऊन कारवाई न झाल्यास नवी मुंबई शहराची भिवंडी होईल असा इशारा, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया यांनी व्यक्त केले आहे.
भाटीया यांच्या हस्ते शुक्रवारी जासई येथील आदर्श ग्राम योजनेअंतर्गतच्या नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. प्रकल्पग्रस्तांनी नैसर्गिक गरजेपोटी २०१२ पर्यंत बांधलेल्या  दोनशे मीटरच्या घरांना हात लावला जाणार नसल्याचा पुरूच्चार त्यांनी केला. सिडकोप्रमाणेच जेएनपीटी प्रभाव क्षेत्रात येणाऱ्या चौदा गावांच्या विकासासाठी सिडकोने नियोजन केले आहे.त्याची सुरूवात दि.बांचे गाव असलेल्या जासई येथून नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया केंद्र उभारून करण्यात आली आहे.या केंद्राच्या उद्घाटनाच्या वेळी सिडकोच्या मुख्य दक्षता अधिकारी डॉ. प्रज्ञा सरवदे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, जासई ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष घरत, सुरेश पाटील, अतुल पाटील, नरेश घरत आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना भाटीया यांनी ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे अनेक नवी मुंबई विमानतळ तसेच सागरी सेतुच्या भूसंपादनाचे प्रश्न मार्गी लागल्याचे सांगून,बंदर परिसरातील शहरांचे नियोजन करून येथील नागरीकांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध प्रकल्प राबविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या परिसरात प्रकल्पग्रस्तांनी नैसर्गिक गरजेपोटी बांधलेली २०१२ पर्यंतची घरे नियमित करण्यासाठी लवकरच योजना तयार करण्यात येणार असून यात प्रकल्पग्रस्तांच्या घरांच्या जमीनी व घरे त्यांच्या नावे असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे येथील तरूणांना प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचेही ते म्हणाले. या परिसरातील गावांना आदर्श करण्यासाठी जेएनपीटी,ओएनजीसी, भारत पेट्रोलियम, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांचेही सहकार्य घेण्यात येणार आहे. घनकचरा नियोजनाचे काम स्त्री मुक्ती संघटना व हरित क्रांती या स्वयंसेवी संघटना करणार आहेत. त्यानंतर गावातील तलावाचेही सुशोभीकरण करण्यात येणार आहे.