राज्यातील कोणत्याही इतर महामंडळाने न साधलेला आध्यात्मिक योग सिडको महामंडळाने रविवारी साधला. रविवारच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने देशातील २४ आध्यात्मिक संस्थांना एकाच छताखाली आणण्याचा विक्रम सिडकोने केला आहे. वाशी येथील भव्य प्रदर्शन केंद्रात झालेल्या या योग दिनाच्या दिवशी सुमारे पाच हजार साधकांना योग तसेच आध्यात्मिक संदेश प्राप्त होऊ शकला. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी आपली सनदी भूमिका बाजूला सारून हजारो साधकांना सहजमार्गाद्वारे मन:शांती देण्याचा मार्ग दाखविला, तर पद्मश्री सदाशिव निंबाळकर यांनी जीवनात योगाचे महत्त्व सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नामुळे जगात रविवारी योग दिन साजरा केला गेला. देशाने तर या साधनेमुळे दोन विश्वविक्रम नोंदविले आहेत. त्याच वेळी राज्यात सिडकोने इतक्या मोठय़ा प्रमाणात हा दिन साजरा करण्याचा विक्रम केला आहे. राज्यात अर्धे शतकापेक्षा जास्त महामंडळे आहेत, पण त्यापैकी कोणत्याही महामंडळाने हा दिन इतक्या मोठय़ा प्रमाणात केलेला नाही. त्यामुळे कोणत्याही शासकीय संस्थेपेक्षा मोठय़ा प्रमाणात हा दिन साजरा करण्याचा मान सिडकोला जात असून, नवी मुंबई पालिकेने तर त्याकडे दुर्लक्षच केल्याचे चित्र होते.
आर्ट ऑफ लिव्हिंग, दिव्य पतंजली योगपीठ, विपश्यना, ब्रह्मकुमारीज, योग निकेतन, आणि इशा फाऊंडेशन या संस्थांच्या सहकार्याने सिडकोने वाशी रेल्वे स्थानकाबाहेरील आपल्याच प्रदर्शन केंद्रात एक वेगळा विक्रम केला. सर्वसाधारणपणे सर्व आध्यात्मिक संस्था एकत्र येऊन काम करीत असल्याचे दृश्य फार कमी प्रमाणात दिसून येते. काही संस्था तर एकमेकांना पाण्यात पाहण्याचे प्रबोधन शिकवत असतात. त्यामुळे सर्वधर्मसमभाव, पंचेंद्रियांवर विजय मिळविण्याचे तत्त्वज्ञान देणाऱ्या या संस्था आणि त्यांचे बाबा दुसऱ्या संस्थेचा आकस करीत असल्याचे अनेक वेळा आढळून आले आहे. त्यामुळे आमची संस्था कशी चांगली आणि प्रबोधनाची धुरा तिच्या खांद्यावर आहे हे त्यातील साधक अभिमानाने सांगत असतात.
नवी मुंबई वसविताना सिडकोने अनेक सामाजिक, धार्मिक संस्थांना भूखंड दिलेले आहेत. यानंतरही २४ भूखंड देण्याचे सिडकोने जाहीर केले आहे. अनेक देश, विदेशांतील संस्थांनी सवलतीच्या दरात हे भूखंड घेऊन याठिकाणी आपले धार्मिक अथवा आध्यात्मिक कार्य सुरू केले आहे. त्यामुळे जमीनदाता असणाऱ्या संस्थेने बोलविल्यानंतर न जाणे या संस्थांना शक्य नव्हते. सिडकोच्या सामाजिक तसेच जनसंपर्क विभागाने आवतन दिल्यानंतर पतंजली, मन:शक्ती, ईशा, ब्रह्मविद्या, तेजज्ञान, आनंद, सहजयोग, योग विद्या निकेतन, सहजमार्ग यासारख्या संस्था योग दिनाच्या निमित्ताने एका छताखाली एकत्र आल्या. त्यातील आर्ट ऑफ लिव्हिंगने विशेष पुढाकार घेतल्याने चार तास योगा शिकविण्याचे कार्य या संस्थेने केले. त्यात पोलिसांपासून पालिकेच्या कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वाचा सहभाग होता.
सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया हे स्वत: योग आणि सहजमार्गाचे प्रशिक्षक आहेत. त्यामुळे त्यांनी या सर्व कार्यक्रमांत हिरिरीने भाग घेतल्याने कार्यक्रमाला भव्य स्वरूप प्राप्त झाले होते. या वेळी नवी मुंबई फेस्टिव्हलचे प्रणेते माजी व्यवस्थापकीय संचालक जी. एस. गिल यांची उपस्थितीतही लक्षवेधी होती. (गिल आता नवी मुंबईकर झालेले आहेत.) योग विद्या निकेतनचे संस्थापक पद्मश्री सदाशिव निंबाळकर यांना भाटिया यांनी सन्मानाने आमंत्रित करून त्यांचा सत्कार केला. योगामध्ये पद्मश्री प्राप्त निंबाळकर यांचा योग दिनाच्या निमित्ताने झालेला सत्कार अनेकांना आनंद देणारा ठरला. निंबाळकर यांनी आपल्या सात मिनिटांच्या भाषणात सुख-शांती, समाधानाकरिता योग आवश्यक असल्याचे सांगितले.