गंध मातीचा
कवी ना. धों. महानोर आणि संगीत आनंद मोडक..! संगीतरसिकांच्या तोंडाला पाणी सुटण्यासाठी ही दोन नावं पुरेशी नाहीत का? ‘युनिव्हर्सल म्युझिक’ची निर्मिती असलेल्या ‘गंध मातीचा’ या नव्या अल्बमच्या निमित्ताने या दोघांचा एकत्रित आविष्कार अनुभवता येतो. ‘महाराष्ट्राच्या मातीतील लोकसंगीत’ अशी या अल्बमची टॅगलाइन आहे आणि या दोघांनी ती अतिशय सार्थ ठरवली आहे.
ही गाणी गाण्यासाठी मोडक यांनी पाचारण केलं आहे ते ‘सारेगम फेम’ ऊर्मिला धनगर या ताज्या दमाच्या गायिकेला. स्वत:ची शैली व ढंग असणाऱ्या या गायिकेने यातील सगळीच गाणी ठसक्यात गायली आहेत.
‘उजळ दान्याच्या ओटी’ हे अस्सल मातीतल्या लोकगीताला मोडक यांनी अनुरूप चाल लावली आहे व ऊर्मिलानेही त्याला न्याय दिला आहे. मोडक यांनी कल्पकतेने वापरलेल्या कोरसमुळे या गाण्याच्या सौंदर्यात भर पडली आहे. यातील ‘झुलत्या अंबरी आला पाऊस मिरगाचा, पाऊस मिरगाचा गं बाई आनंद सर्गाचा’ या महानोरांच्या ओळींना दाद द्यावी तितकी कमीच. ‘रूप गं तुझं सकवार थोडं सांभाळ’ हे गाणं म्हणजे बठकीची लावणी आहे. त्यासाठी सारंगी आणि तबला या वाद्यांचा मोडक यांनी चपखल वापर केला आहे. ‘हिरव्या रानाची झाली दैना’ हे उदास गीत अस्वस्थ करून जातं तर ‘अजून माझं वय नवतीचं पोरी’ या तारुण्याची महती सांगणाऱ्या गीताची उडती चाल मनाला वेधून घेते. बासरी, हार्मोनियम आणि कोरसच्या साहाय्याने या गाण्याची रंगत वाढली आहे.
‘आई मी जोगवा मागते’ हा एक वेगळा जोगवा महानोरांनी लिहिला आहे. ‘भरलं आभाळ शिवारात भरलं पीकपाणी, पाखरांच्या चोची गातात नवी गाणी’ हे आणखी एक निसर्गगीत ऊर्मिलाने छान गायलं आहे. महानोर-मोडक जोडीने या गाण्यातही कहर केला आहे. या अल्बमची सुरुवात बुद्धवंदनेने होते तर सांगता ‘दिली भीमराया नवी चेतना’ या माìचग साँगने होते. या दोन्ही रचनाही उत्तम आहेत, मात्र अल्बममधील इतर गाण्यांपेक्षा वेगळ्या आशयाच्या या रचनांचं प्रयोजन बुचकळ्यात टाकतं. मात्र, एकंदरीत विचार केला तर गरफिल्मी मराठी गाण्यांमध्ये हा अल्बम महत्त्वाचा ठरेल यात शंका नाही. गीत-संगीत-गायन अशा सर्वच आघाडय़ांनी बाजी मारली आहे. आनंद मोडक आणि ना. धों. महानोर यांच्यासारख्या प्रतिभावंतांना चित्रपटांसाठी गाणी करताना प्रत्येक वेळी मनासारखं काम करण्याचं स्वातंत्र्य आणि संधी मिळत नसेल, या अल्बमच्या माध्यमातून त्यांनी ती संधी उत्तमप्रकारे साधली आहे.
मन बावरे
‘युनिव्हर्सल म्युझिक’ने ‘मन बावरे’ हा आणखी एक अल्बम सादर केला आहे. यातील गीते प्रशांत मडपूवार यांनी लिहिली असून अभिजित राणे यांनी ती संगीतबद्ध केली आहेत. गीत-संगीताचा उत्तम मेळ यातही साधला गेला आहे. ही सर्व गाणी श्रवणीय झाली आहेत. ‘आलं आभाळ भरून’ या गीताने या अल्बमची सुरुवात होते. बेला शेंडेच्या उत्फुल्ल आवाजातील या गाण्याची चाल मन प्रसन्न करणारी आहे.
पं. उल्हास बापट यांचं संतूरवादन आणि विजय तांबे यांचं बासरीवादन ही या गाण्याची आणखी वैशिष्टय़े मराठीत सहज गाणाऱ्या शंकर महादेवन यांच्या स्वरात ‘घागर घेऊन नटूनथटून यमुनेतिरी येई राधा’ हे गाणं ऐकण्यास मिळतं. दृतलयीतील या गाण्यातही बासरीचा छान वापर करण्यात आला आहे.
बेला शेंडे व अतींद्र सरवडीकर यांनी गायलेलं ‘कान्हा कान्हा भास हा तुझाच कान्हा’ हे आर्त युगुलगीत चांगलं जमलं आहे. त्याच्या सुरुवातीला ‘जानत हू तोरे मनका हर गीत रे राधा’ ही मांड रागातील सुरावट मनात रेंगाळत राहते. ‘या अंबरात घन दाटतात अन् पावसाची सर येते’  हे पाऊसगीत स्वत: अभिजित राणे यांनी उत्तमप्रकारे सादर केलं आहे.
‘मन बावरे फिरते असे वाऱ्यासवे’ हे शीर्षकगीत बेलाने गायलं आहे. पाश्चात्त्य वाद्यमेळाने सजलेल्या या गाण्याची चाल अशी आहे की, मोरपिसासारखं हलकं होऊन हवेत तरंगल्याचा भास व्हावा. एकूणच या शब्दांना संगीतकाराने चांगला न्याय दिला आहे आणि बेलानेही तो हळुवार भास जपला आहे.
‘हलकेच ती हसली जरा, हलकेच मी ते पाहिले’ हे पॉप ढंगातलं गाणं ऋषिकेश रानडेने तब्येतीत गायलं आहे तर ‘साद दे मनास’ या उडत्या चालीच्या गाण्याला रोहिणी ठाकरेने न्याय दिला आहे. शंकर महादेवन यांनी गायलेल्या ‘अशी अचानक कातरवेळी’ या गाण्याने अल्बमची सांगता होते. हे विरहगीत त्यांनी कमालीच्या आर्ततेने गायलं आहे. अनेक आघाडीच्या वाद्यवृंदांत तसेच टीव्हीवरील अनेक कार्यक्रमात सिंथसायझरवर सफाईने बोटं फिरवणाऱ्या प्रशांत लळीतने या अल्बमचे अनुरूप संगीत संयोजन केले आहे. संतूर, बासरी, व्हायोलिन, सेक्सोफोन, गिटार आदी वाद्यांनी या अल्बमची श्रीमंती वाढवली आहे.
    -अनिरुद्ध भातखंडे