मावा, सुगंधी तंबाखू, सुगंधी सुपारी यावर बंदी घातल्याने लोक दारू, गर्द, ब्राऊन शुगर अशा घातक व्यसनांकडे वळतील. तर पानपट्टीचालक देशोधडीला लागतील, असा धोक्याचा इशारा पानपट्टीचालकांनी शनिवारी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना दिला. मात्र त्याकडे ठाम दुर्लक्ष करून मंत्री पाटील यांनी राज्य शासनाच्या गुटखा-मावा बंदीचे ठणकावून समर्थन केले.
 शिवाय पानपट्टीचालकांना अन्य व्यवसाय करावयाचा असेल तर त्यासाठी सहकार्य करण्याची तयारीही त्यांनी दर्शविली. येथील शाहू स्मारक भवनमध्ये कोल्हापूर जिल्हा पानपट्टी असोसिएशनच्यावतीने पानपट्टीचालकांचा मेळावा आयोजित केला होता. पानपट्टी असोसिएशनचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अरूण सावंत व सांगली जिल्हाध्यक्ष एकनाथ सूर्यवंशी यांनी नुकत्याच लागू झालेल्या सुगंधी सुपारी, सुगंधी तंबाखू व मावा बंदीमुळे पानपट्टीचालकांना सोसाव्या लागणाऱ्या समस्यांची मांडणी केली. त्यांनी गृहराज्यमंत्री पाटील यांना निवेदन दिले. शासनाच्या अध्यादेशाने पानपट्टी व्यवसाय कोलमडून पडणार आहे. या व्यवसायातील अनेक व्यक्ती व परिवार देशोधडीला लागून रोजी रोटीचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे शासनाचा हा अध्यादेश मागे घेण्यास भाग पाडावे, अशी मागणी मंत्री पाटील यांना करण्यात आली. सुपारी भाजून ती चूना जर्दा सोबत मिसळून देण्याचा पानचालकांचा धंदा हा पिढीजात आहे. पानपट्टीचालक मावा अज्ञानी मुलांना विकत नाहीत. तसेच दर्जाच्या बाबतीत ते ग्राहकांची फसवणूक करीत नाहीत, असे सांगत पानपट्टीचालकांनी आपल्या व्यवसायाचे समर्थन केले. तथापि मंत्री पाटील यांनी शासनाच्या निर्णयाचे समर्थन केले.