सोलापूर महापालिकेच्या महात्मा गांधी प्राणिसंग्रहालयाच्या बाहेरील बाजूला मदानात दलदलीच्या ठिकाणी सापडलेल्या मगरीला पकडण्यासाठी वनविभागाच्या यंत्रणेने केलेले प्रयत्न तोकडे ठरले असतानाच अखेर स्थानिक युवकांनीच धाडस दाखवून गुरुवारी सकाळी मगरीला पकडले. या मगरीला वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. मात्र मगरीला पकडताना दोघे जण जखमी झाले.
विजापूर रस्त्यावर रेवणसिद्धेश्वर मंदिराजवळ असलेल्या महापलिकेच्या म. गांधी प्राणिसंग्रहालयाबाहेर खुल्या मदानावर एका बाजूस दलदलीमध्ये १५ दिवसांपूर्वी दोन मगरी आढळून आल्या होत्या. या मगरी प्राणिसंग्रहालयातूनच बाहेर पडल्या असाव्यात असा कयास बोलून दाखविला असता पालिका प्रशासनाने मात्र त्याचा इन्कार करून या मगरी प्राणिसंग्रहालयातून नव्हे तर अन्य ठिकाणाहून आल्या असल्याची शक्यता वर्तविली होती. त्यामुळे या मगरी नेमक्या आल्या कोठून, याबद्दलचे गूढ वाढले असतानाच दुसरीकडे वनविभागाकडून या मगरी पकडण्यासाठी प्रयत्न हाती घेण्यात आले. त्यासाठी पिंजरे लावण्यात आले होते. परंतु आसपास बघ्यांची गर्दी कायम राहिल्याने मगरी पिंज-याकडे न येता दलदलीतच दडून राहिल्या होत्या. वनविभागाच्या यंत्रणेनेही त्यापलीकडे फारसे प्रयत्न न केल्यामुळे या मगरीबद्दल स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या पाश्र्वभूमीवर अखेर गुरुवारी सकाळी स्थानिक तरुणांनी धाडस दाखवून मगरीला पकडण्याची योजना आखली आणि प्रत्यक्ष मगरीला जेरबंद करण्यासाठी युवकांचे पथक दलदलीत उतरले. दलदलीत मगरीचे पिलू दिसता क्षणी युवकांनी मोठय़ा कौशल्याने मिळेल त्या साधनांची मदत घेऊन मगरीच्या पिलाला बांधून टाकले. नंतर ही मगर वनविभागाकडे सुपूर्द करण्यात आली. दुस-या मगरीचा शोध लागला नाही.